लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माजी राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील हे विधान परिषदेतीलकाँग्रेसचे नवे गटनेते असतील तर अमिन पटेल हे विधानसभेत पक्षाचे उपनेते असतील. अ. भा. काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र विधिमंडळातील पक्षाच्या नियुक्ती जाहीर केल्या.
माजी मंत्री अमित देशमुख हे विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद, तर विश्वजित कदम सचिव आणि शिरीष नाईक व संजय मेश्राम हे प्रतोद म्हणून काम पाहतील. विधान परिषदेत अभिजित वंजारी हे काँग्रेसचे मुख्य प्रतोद, तर राजेश राठोड हे प्रतोद असतील. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत असताना या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस नेतृत्वाने या आधीच नियुक्ती केली आहे.