डील फिस्कटली म्हणून 'मातोश्री'वर परतल्या; ठाकरेंच्या गायब झालेल्या नगरसेविकेवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:54 IST2026-01-23T16:38:27+5:302026-01-23T16:54:45+5:30
नगरसेविका सरिता म्हस्के पैशांची डील झाल्याने दोन दिवस गायब होत्या असा आरोप भाजपच्या ईश्वर तायडेंनी केला आहे.

डील फिस्कटली म्हणून 'मातोश्री'वर परतल्या; ठाकरेंच्या गायब झालेल्या नगरसेविकेवर गंभीर आरोप
Ishwar Tayade On Sarita Mhaske: मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सुरू झालेल्या गट नोंदणी प्रक्रियेत शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या गायब होण्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या म्हस्के या बुधवारी अचानक बेपत्ता झाल्याने त्या भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी त्या मिलिंद नार्वेकरांकडे गेल्या. मात्र आता भाजपकडून म्हस्के यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्या पैशांची डील झाल्याने गेल्या होत्या असा दावा केला जातोय.
गट नोंदणीच्या वेळी डॉ. सरिता म्हस्के अनुपस्थित राहिल्याने उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी तातडीने सूत्रे हलवली. पहाटेच्या सुमारास नार्वेकरांनी म्हस्केंशी संपर्क साधला आणि त्यांना थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नेले. त्यानंतर कोकण भवन येथे नेऊन त्यांची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर म्हस्के यांनी आपल्या गायब होण्यामागचे कारण स्पष्ट केले.
"मी तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते, माझा नवस होता. गट नोंदणीच्या बैठकीचा मेसेज मला उशिरा मिळाला. दरम्यान, मीडियात उलटसुलट बातम्या सुरू झाल्यामुळे पक्षाकडून मला फोन बंद ठेवण्याचे आदेश आले होते, असं म्हस्के यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला.
डॉ. म्हस्के यांनी केलेला देवदर्शनाचा दावा भाजप नेते ईश्वर तायडे यांनी फेटाळून लावले. चांदिवलीतील स्थानिक भाजप पदाधिकारी ईश्वर तायडे यांनी म्हस्केंवर गंभीर आरोप केले आहेत.
आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे
"डॉक्टर सरिता म्हस्केंच्या गैरहजेरी मागचं खरं कारण देवदर्शन नव्हे तर लक्ष्मी दर्शन आहे. हे देवदर्शन नव्हतं हे लक्ष्मी दर्शन होतं आणि हे लक्ष्मी दर्शन झालं नाही म्हणून ते परत आले. या निवडणुकीच्या अगोदरच ज्या नेत्यांनी त्यांना निवडून आणलेलं आहे त्यांनी डील केलेली आहे आणि ऍडव्हान्स घेतलेले आहेत. त्या नेत्याने सांगितले होते की तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला इथे यावं लागेल. नेत्यांनी त्यांना पनवेलला पळवून नेलं होतं. रात्री लक्ष्मी दर्शनची डील बरोबर झाली नाही. त्यांच्यावर खूप कर्ज आहे खूप खूप कर्ज आहे. ते कर्ज त्यांना चार दिवसांमध्ये मिटवायचं आहे. त्यांना स्वतःचं २० कोटी रुपयाचं एक हॉस्पिटल त्यांना गावी उभारायचं आहे. ती डील पूर्णपणे झाली नाहीये. त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या लवकर नाही होणार. पण ठीक आहे आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे," असा इशारा ईश्वर तायडे यांनी दिला.
"ज्या नेत्याने त्यांना निवडून आणलं तो राज आणि उद्धव ठाकरे यांचा झाला नाही. आपली नगरसेविका त्या नेत्याच्या तालावर नाचणारी आहे. या नगरसेविकेने मतदारांचा विश्वासघात केला आहे. चार दिवसांमध्ये तुम्हाला २५ खोके हवे होते. ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं त्यांचे काय? कशासाठी गेला होता हे सगळ्यांना कळालेलं आहे," असेही ईश्वर तायडे म्हणाले.