"संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’, रामदास कदमांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:30 IST2022-07-27T14:30:01+5:302022-07-27T14:30:40+5:30
Ramdas kadam Criticize Uddhav Thackeray : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.

"संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’, रामदास कदमांची घणाघाती टीका
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासदार, बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.
रामदास कदम या मुलाखतीबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सगळं हास्यास्पद आहे. बरं त्यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची शिवसेना आई होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना. आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठीक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतलाय, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अमूक गद्दार, तमूक हरामखोर ही भाषा वापरत आहेत. ही भाषा वापरण्यापेक्षा स्वत:चं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करून बघा. ५१ आमदार का जातात, १२-१४ खासदार का जातात, शेकडो नगरसेवक का जातात, आज माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीशिवाय दुसरं काम काय सुरू आहे. फक्त शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेल करायचं, आवाहन करायचं एवढंच काम सुरू आहे. तीन वर्षांत आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.