Join us  

Sanjay Raut : मिठाच्या खड्यावरुन संजय राऊतांचे बाण, अजित पवारांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:50 AM

केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या शरद पवार थोडे आजारी आहेत.

ठळक मुद्देपुन्हा भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही.

मुंबई - गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेचा सामनातून समाचार घेण्यात आलाय. फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत असा आरोप शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपावर केला आहे. (Shivsena Target BJP over news of Amit Shah And Sharad Pawar meeting at Ahmadabaad). शिवसेनेनं भाजपावर टीकेचा बाण चालवताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिमटा घेतला आहे.   

केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या शरद पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे असा टोला शिवसेनेने भाजपाला आणि केंद्र सरकारला लगावला आहे. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल रोखठोक मत मांडल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्लाच संजय राऊत यांना दिला होता. आजच्या अग्रलेखातून अजित पवारांच्या या वाक्याचा संदर्भ पकडत भाजपवर निशाणा साधला आहे. 

''भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे.'', अशा शब्दात सामनातून अजित पवारांना कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत. 

काय म्हणाले होते अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री कोण होणार, याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थाने काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना सुनावले होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधाने करू नयेत. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही पवार यांनी म्हटले होते.   

टॅग्स :संजय राऊतअजित पवारशिवसेनाअनिल देशमुखभाजपा