“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:03 IST2025-12-25T13:01:27+5:302025-12-25T13:03:54+5:30
Sanjay Raut News: मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
Sanjay Raut News: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही काय केले मराठी माणसासाठी हे दाखवा. गौतम अदानी यांना मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही. मोदींच्या मित्राच्या घशात फुकटात मुंबई घालणे, ही मुंबई आणि मराठी माणसांची सेवा आहे का तुमची? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेनंतर भाजपाने टीका केली होती. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या टीकेचा समाचार घेत सांगितले की, ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले, तर मग तुम्ही एकमेकांची चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आलात का? भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केले? मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले
मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही
बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू. मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य होते या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचे, ते केले का तुम्ही? एक गोपीनाथ मुंडे सोडले, तर कधीही कोणी अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव सीमा प्रश्नाच्या बाबतीत, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही. ना या राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावे लागले असते. सत्तेसाठी तुम्ही आमची मराठी माणसाची शिवसेना फोडलीत. मराठी माणसाची संघटना बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिली. हे तुमचे मराठी प्रेम, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.