“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:08 IST2025-07-19T12:03:09+5:302025-07-19T12:08:04+5:30
Sanjay Raut News: या दुबेचा निषेध भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसला नाही. भाजपा आणि शिंदे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
Sanjay Raut News: तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका. भाजपाचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे. समुद्रात बुडवून बुडवून मारू. हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल, तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील जाहीर सभेत दिले. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्ट भाष्य केले.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज ठाकरे यांचे आव्हान एका दुबेला नाही, तर भारतीय जनता पक्षाला आहे. दुबे हा भारतीय जनता पक्षाचा पुढारी आणि खासदार आहे. या दुबेचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी केलेला दिसला नाही. नाराजी काय व्यक्त करत आहात, शेंबूड पुसल्यासारखे, तुम्ही मराठी-मराठी बोलत आहात. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो. महाराष्ट्राला आव्हान देतो. मराठी माणसाला मारण्याची भाषा करतो आणि हे भाजपा आणि मिंधे गटाचे लाचार मान खाली करून बसले आहेत. राज ठाकरे काय चुकीचे बोलले? आमचेही मत तेच आहे. म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले, त्या विषयावर शंभर टक्के आम्ही एकत्र आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
सरकार मारामारीला समर्थन देत आहे
मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहे, कसे हे महाराष्ट्राला समजून सांगितले पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने मराठी भाषेवर हिंदी सक्ती लादत आहात. अख्खी मुंबई गौतम अदानींच्या हातात देत आहात, एका गुजराती उद्योगपतीच्या हातात देत आहात. मुंबईमध्ये मराठी माणसाला घरे घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही. मुंबईतील गिरणी कामगार हा कर्जतच्या पुढे फेकला जात आहे. त्यांनी शांतपणे गिरगाव चौपाटीवर सगळ्या मराठी माणसांना बोलावून सांगावे की, या गोष्टीमुळे मराठी माणसाचा मुंबईवर हक्क आहे. हे कोण दुबे आव्हान देत आहेत. विधिमंडळाच्या मंचावरून मराठी माणसाला फसवणे बंद करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, उद्या दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन यांना ही भाजपा प्रवेश देईल. ते इतके वर्ष देशाबाहेर आहेत. त्यांच्यावर हल्ली कोणताही गुन्हा नाही, असे सांगतील. नाशिकमध्ये जसे गुन्हे मागे घेतले, तसे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेते जातील, कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना संपवायचे आहे. विधान भवनात त्यांना एका आमदाराची हत्याच करायची होती. मकोकाचे आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्षात दारात उभे राहून मारामारी करत आहेत. तुमच्या आमदाराची एवढे हिंमत कशी वाढते. गुन्हेगारांना आमदार, खासदार व्हायचे आहे आणि संरक्षण घ्यायचे आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.