Sanjay Raut PC News: अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन अनेक उपक्रम करत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण महापालिकांमधील मनसे युतीबाबत तुम्ही प्रश्न विचारला, त्याचे मी फक्त उत्तर दिले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. नाशिक येथे एक मोठा मोर्चा निघणार आहे, तिथे मनसे शिवसेनेसोबत या विराट मोर्चात असणार आहे. निवडणूक एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. मुंबई हे आमचे टार्गेट आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांच्या व्यापार मंडळाचे टार्गेट मुंबई आहे. त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे, तसेच ठाकरे बंधूंचे टार्गेट आहे की, मुंबई ही गुजरातींच्या हातात सोपवायची नाही. ती मराठी माणसांकडे राहिली पाहिजे, हेच आमचे टार्गेट आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीपदाची लॉटरी नाही, तो तर मटका
भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक विधान केले. याबाबत संजय राऊतांनी प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकार लॉटरी चालवत होते. पण आता राज्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरीही आकडा हा लावला जात आहे. गणेश नाईक यांनी लॉटरी हा शब्द वापरला, त्यांनी ठाण्यात हे सूचक वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असावा. मुख्यमंत्रिपदासाठी मटका लागला असावा, असे त्यांना म्हणायचे असावे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार-चार मटके लोक चालवतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, मुळात म्हणजे गिरीष महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळत आहे, हे त्यांनी पाहवे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल, त्या दिवशी त्यांचे काय हाल असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू हे राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. चोर दरोडेखोर हे जे फडणवीसांच्या भोवती आहेत, त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.