Sanjay Raut: 'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:12 IST2021-08-26T13:11:25+5:302021-08-26T13:12:06+5:30
Sanjay Raut: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातील भाषेवरुन भाजपा आक्रमक झाली असून 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Sanjay Raut: 'सामनाच्या अग्रलेखाची जबाबदारी माझी; रश्मी ठाकरेंची नाही'; संजय राऊत कडाडले
Sanjay Raut: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातील भाषेवरुन भाजपा आक्रमक झाली असून 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी रोखठोक शब्दांत संताप व्यक्त केला. "सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची सगळी जबाबदारी या संजय राऊतची आहे", असं राऊत यांनी ठणकावून म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद यावरुन गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राणे आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली जात आहे.
खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका; राऊतांनी सुनावलं
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचं काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणी तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे हे आधी लक्षात घ्या", असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
आदेश देण्याचा अनिल परबांना अधिकार
नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी दबाव आणल्यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून राणेंनीही आपल्या पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता. याच मुद्द्यावरुन भाजप अनिल परबांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करत असल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी परब यांची पाठराखण केली.
"अनिल परब यांची कोणती क्लिप व्हायरल होतेय ते मला माहित नाही. मी काही ती ऐकलेली नाही. पण ते तिथले पालकमंत्री आहेत. माहिती घेण्याचा आणि अधिकाऱ्यांशी बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे", असं संजय राऊत म्हणाले.