'ते आधी बोललेच कसे?'; पवारांच्या उमेदवारीवरून ठाकरेंसमोरच चतुर्वेदी भडकल्या?; राऊत म्हणाले, "मी जन्मापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:35 IST2026-03-26T11:07:55+5:302026-03-26T11:35:22+5:30

राज्यसभेच्या जागेवरून ठाकरे सेनेत ठिणगी पडल्याची चर्चा सुरु असून संजय राऊतांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

Sanjay Raut Responds After Priyanka Chaturvedi Questions His Authority in Party Meeting | 'ते आधी बोललेच कसे?'; पवारांच्या उमेदवारीवरून ठाकरेंसमोरच चतुर्वेदी भडकल्या?; राऊत म्हणाले, "मी जन्मापासून..."

'ते आधी बोललेच कसे?'; पवारांच्या उमेदवारीवरून ठाकरेंसमोरच चतुर्वेदी भडकल्या?; राऊत म्हणाले, "मी जन्मापासून..."

Sanjay Raut on Priyanka Chaturvedi: महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत तणाव पाहायला मिळाल्याची चर्चा आहे. प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजी आणि मराठवाड्यातील एका खासदाराने विचारलेला सवाल यामुळे या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे म्हटलं जात आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने प्रियांका चतुर्वेदींनी या बैठकीत संताप व्यक्त केल्याची चर्चा सुरु झालीय. मात्र खासदार संजय राऊत यांनी असं काही घडलं नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांशी संवाद साधला. "बाहेर चर्चा आहे की माझे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे," असे सांगत ठाकरेंनी बैठकीची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काँग्रेस हायकमांडशी झालेली चर्चा आणि शरद पवारांच्या उमेदवारीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीतील संभाव्य संघर्ष कसा टाळला, याची माहिती दिली.

मात्र, याच दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट आक्षेप घेतला. I want to protest असे म्हणत त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव का घेतले? त्यांना तो अधिकार कोणी दिला? असा  सवाल चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंसमोरच विचारल्याचे म्हटलं जात आहे. 

उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका आणि राऊतांची पाठराखण

खासदार चतुर्वेदी यांच्या संतापावर उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, "संजय राऊत काही बोलले म्हणून काय झालं? शेवटी या पक्षाचा प्रमुख मी आहे आणि अंतिम निर्णय मीच घेतो." ठाकरेंनी राऊतांची बाजू घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्याने प्रियांका चतुर्वेदी तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

६ वर्षात काय उपयोग झाला? खासदाराचा बोचरा सवाल

बैठक संपत असतानाच वादात आणखी एक ठिणगी पडली. मराठवाड्यातील एका खासदाराने थेट उद्धव ठाकरेंना विचारले की, प्रियांका चतुर्वेदी यांना ६ वर्षे संधी देऊन पक्षाला काय उपयोग झाला? या प्रश्नामुळे बैठकीतील वातावरण अधिकच गंभीर झाले. 

संजय राऊतांनी फेटाळले वृत्त

दुसरीकडे, संजय राऊत यांनी या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. "मी त्या बैठकीला नव्हतोच. मी पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य आहे. मी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या पक्षाच्या जन्मापासूनचा सदस्य आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे. उद्धव ठाकरे आणि माझं काय नातं आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर विचार करुन जर कोणी काम करु लागलो तर पक्ष उभा राहिला नसता, वाढला नसता. पण असं काहीही घडलेलं नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत," असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

Web Title : पवार की उम्मीदवारी पर विवाद: चतुर्वेदी ने ठाकरे से सवाल किया; राउत का खंडन।

Web Summary : शरद पवार की राज्यसभा उम्मीदवारी पर उद्धव ठाकरे को असंतोष का सामना करना पड़ा। प्रियंका चतुर्वेदी ने राउत के अधिकार पर सवाल उठाया। ठाकरे ने राउत का बचाव किया, अंदरूनी कलह की अफवाहों को खारिज किया। राउत ने घटना से इनकार किया, इसे गलत सूचना बताया।

Web Title : Pawar's candidacy sparks row: Chaturvedi confronts Thackeray; Raut denies rift.

Web Summary : Uddhav Thackeray faced dissent over Sharad Pawar's Rajya Sabha candidacy. Priyanka Chaturvedi questioned Raut's authority. Thackeray defended Raut, dismissing rumors of internal conflict. Raut denied the incident, calling it misinformation.