“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:54 IST2024-12-24T10:53:36+5:302024-12-24T10:54:28+5:30

Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: राज ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत. मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

sanjay raut reaction over raj thackeray and uddhav thackeray meet | “राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत

“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: विधानसभा निवडणुकीच्या निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. त्यानंतर या भावांनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्याबाबत दोन्ही पक्षांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. त्यातच मागील ७ दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दोनदा भेट झाली आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू भेटले असले तरी त्यांच्या भेटीतून यांच्यातील दुरावा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा विवाह होता, त्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले की महाराष्ट्राला आनंदच होतो. राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाहीत. मात्र मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देतात. त्यामुळे आमचे मतभेद आहेत, मात्र कुटुंब एकच असते. अजित पवार शरद पवार एकत्र येऊन भेटतात. रोहित पवार काकांना भेटतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेट ही एक कौटुंबिक भेट होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे यांचे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे आदर्श

जनतेचे दोन्ही भावंडांवर जीवापाड प्रेम आहे. त्याच दृष्टीने मराठी माणूस त्यांच्याकडे बघत असतो. दोघांचे पक्ष वेगळे आहेत. त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. कुटुंब म्हणून आम्ही कायम एक आहोत. राज ठाकरे यांचे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे आदर्श आहेत. आमच्या पक्षाचे तसे नाही.  महाराष्ट्रावर अन्याय करणारे, आमचा पक्ष फोडणारे हे लोक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अनेक चर्चा सुरू आहेत. ही चर्चा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण राज ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले आहे.  त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी माझे जवळचे नाते राहिलेले आहे. माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हेही माझ्या अतिशय जवळचे आणि मोठ्या भावाप्रमाणे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: sanjay raut reaction over raj thackeray and uddhav thackeray meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.