संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 19:24 IST2025-04-08T19:19:12+5:302025-04-08T19:24:52+5:30

Thackeray Group Sanjay Raut News: सहदेव आता श्रीकृष्णाच्या जवळ आलेला आहे. कोकणच्या कुरुक्षेत्रावरील युद्ध आपण जिंकणार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

sanjay raut praised uddhav thackeray at matoshree while congress leader sahadev betkar joining shiv sena thackeray group | संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”

संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”

Thackeray Group Sanjay Raut News: आमच्या पक्षात आला सहदेव आले आहेत. महाभारतातील तीन पात्रे येथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, मी संजय आहेच आणि सहदेव हे फार महत्त्वाचे पात्र होते. धर्मराजाच्या अत्यंत जवळचे कोण असेल, तर सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आलेला आहे. आपण सगळे शिवसैनिक आहात. सहदेवांच्या येण्याने कोकणातील कुरुक्षेत्रावर जे नवे महायुद्ध सुरू झाले आहे, ते युद्ध आपण जिंकणार आहोत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

रत्नागिरीतील काँग्रेसचे सहदेव बेटकर यांनी मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे श्रीकृष्ण असल्याचे म्हटले आहे.

आपण कोकणभूमीत पाऊल टाकले की, कशी दाणादाण उडते ते पाहा

सहदेवांना सांगितले आहे की, आता हे शेवटचे मैदान, आता मैदान बदलायचे नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करायचा आहे आणि ठेकेदारांचे राज्य संपवून टाकायचे आहे, असे संजय राऊत यांनी सहदेव बेटकर यांना सांगितले. मी उद्धव ठाकरेंना एवढेच सांगेन की, कोकणातून किती लोक शिवसेनेत प्रवेश करायला आले आहेत, यावरून बाहेर केवळ हवा आहे आणि हवेची दिशा आता मला बदलताना दिसत आहे. आपण फक्त कोकणात एक पाऊल टाका. आपण कोकणभूमीत पाऊल टाकले की, कशी दाणादाण उडते ते पाहा. कोकणात आम्ही खूप लढाया केल्या आहेत. लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आहे. सहदेव तुमचा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे. पुढील भविष्यात आपल्याला राजकीय दृष्ट्‍या आणि सामाजिक दृष्ट्‍या याचा खूप फायदा होणार हे नक्की, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही लोक शिवसेनेतून गेले मोठे झाले. पण त्यांना मोठी करणारी माणसे माझ्यासोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहेत. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे. कोकणात एक पाऊल टाका असे मला सांगण्यात आले पण मी सांगतो एकच पाऊल टाकणार नाही पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करेन. कोण मधे येतो बघू. अख्खा महाराष्ट्र, माझे शिवसैनिक, शेतकरी बांधव सगेळ सांगत आहेत की, आम्ही फसवलो गेलो. आत्ता लोकांना खरी आपल्या शिवसेनेची गरज आहे. येत्या १६ एप्रिलला नाशिकला शिबीर घेण्यासाठी जातो आहे. सुट्ट्या संपल्या की माझा सलग दौरा मी तळ कोकणापर्यंत करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

 

Web Title: sanjay raut praised uddhav thackeray at matoshree while congress leader sahadev betkar joining shiv sena thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.