संजय राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:39 IST2020-07-06T05:38:38+5:302020-07-06T05:39:35+5:30
खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप आॅक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप केला आहे.

संजय राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत - चंद्रकांत पाटील
मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेल्या भांडणामुळे सरकार पडेल, अशी भीती संजय राऊत यांना वाटत आहे. त्यांची ही भीती महाराष्ट्रातील सर्वांनाच माहीत आहे. हीच भीती ते भाजपच्या नावाने बोलून दाखवत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप आॅक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल, असा आरोप केला आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र अडकला असताना भाजपवर खोटे आरोप करणे राऊत यांना महत्त्वाचे वाटते. दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहीत आहे. या सरकारच्या कार्यकाळात पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारीदेखील असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांची बियाणे आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तर यांना सोडवावीशीदेखील वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून भाजपवर आरोप केले जात असल्याचे पाटील म्हणाले.