Shiv Sena Sanjay Raut ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर इथं भेट घेतली आहे.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष आगामी काळात ईव्हीएमविरोधात रान पेटवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शरद पवार यांच्या पक्षाने कायदेशीर पातळीवर तयारी सुरू केली आहे. अशातच आज संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षही या लढाईत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राऊत आणि शरद पवार यांच्यात आजच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप हाती आलेला नाही.
निवडणूक आयोगाचे काय आहे म्हणणे?
"सर्व राजकीय पक्षांच्या सहभागाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची एक पारदर्शक प्रक्रिया झाली होती. मतदानाच्या आकडेवारीत कोणत्याही प्रकारचे घोळ नाहीत. सर्व उमेदवारांची प्रत्येक मतदान केंद्रांवरील आकडेवारी उपलब्ध असून त्याची पडताळणीही झाली आहे. अंतिम आकडेवारीत फरक दिसतो; कारण संबंधित पीठासीन अधिकारी ही आकडेवारी अंतिम करण्यापूर्वी अनेक कायदेशीर कर्तव्याचे पालन करून प्रक्रिया पूर्ण करीत असतात," असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे.