Join us

"महायुतीत चौथ्या माणसाला जागा नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, "आम्ही तुमच्या दारात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:33 IST

उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut on CM Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. अशातच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेच्या कौतुकापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी आम्ही तुमच्या दारात येणार नाही असं म्हटलं आहे.

झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही असं काय केलं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमचं कौतुक करत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना," काही लोकांच्या कौतुकापासून नेहमी वाचायला हवं. या कौतुकाला तुम्ही तुमचं कौतुक समजलं तर तुमचं नाव इतिहासात जमा होतं. त्यामुळे अशा प्रकारे कौतुक होत असतं त्याला सोडून द्यायला हवं," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे बंद असणार आहेत का असंही विचारण्यात आलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. "याबाबत प्रश्नच येत नाही. कारण आता महाराष्ट्रात लोकांनी आमच्या तिघांना खूप चांगले बहुमत दिले आहे. त्यामुळे आम्ही तीन लोक आमच्या खुर्च्यांवर असे घट्ट बसलो आहोत की चौथ्या माणसाला जागा सोडली नाहीये आणि आवश्यकता पण नाही. म्हणून मी मानत नाही की कुठला दरवाजा उघडा कुठला दरवाजा बंद अशा प्रकारच्या चर्चेला जागा नाही. महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आमचे महायुतीचे सरकारच शेवटपर्यंत महाराष्ट्रात काम करणार," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. "आमचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार तुम्हाला भेटणारच. नाहीतर तुम्ही एक शासन आदेश काढा की विरोधी पक्षाच्या आमदारांनी मला भेटू नये. तुम्ही शासन आदेश काढला की आम्ही मोकळे झालो. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात एका गटाचे नाही. आपल्याकडून लोकशाहीला बाधक असेल अशी भूमिका घेतली जाणार नाही असे आम्हाला वाटतं," असं संजय राऊत म्हणाले.

"भाजपला आता दरवाजाच उरलेला नाही. कोणत्याही भ्रष्टाचारी व्याभीचारी माणसांना यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे. आम्ही भ्रष्टाचारी आणि व्याभीचारी नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारात येणार नाही. तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा झाला आहे," अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेसंजय राऊतमहायुती