Join us

Lakhimpur Kheri Incident: “प्रियांका गांधींमध्ये थेट माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 09:28 IST

Lakhimpur Kheri घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी हिंसाचाराला अनेक दिवस झाले असले, तरी या घटनेच्या (Lakhimpur Kheri Incident) तीव्रतेमुळे अजूनही यावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. शनिवारी रात्री या प्रकरणी उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अमित मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली. या एकूणच घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आणि यानिमित्ताने त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसले. प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील

लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशाने पाहिले. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचे देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल, असे संजय राऊत आपल्या रोखठोकमध्ये म्हणाले.

येणारा काळच ठरवेल

हाथरसपासून लखीमपूर खेरीपर्यंत राहुल आणि प्रियांका त्याच पद्धतीने वागल्या. प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही, हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे, हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियांका यांनी दाखवले. इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले आणि सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :लखीमपूर खीरी हिंसाचारइंदिरा गांधीप्रियंका गांधीसंजय राऊतभाजपा