Join us

Sanjay Raut: भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता वैध आहेत का?, संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 10:53 IST

Sanjay Raut: सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुख काही पळून गेलेले नाहीत. ते स्वत:हून ईडीसमोर हजर झाले. जे लोक देश सोडून पळून जातात त्यांना केंद्रीय सत्तेचं पाठबळ असतं. अनिल देशमुखांना झालेली अटक कायद्याला आणि नीतीमत्तेला धरुन नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अनिल देशमुख यांना मध्यरात्री ईडीनं १३ तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई केली. त्याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. "अनिल देशमुख काही पळून गेलेले नाहीत. ते स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर झाले आणि पहिल्याच चौकशीत त्यांना अटक केली जाते हे धक्कादायक आहे. त्यांची चौकशी केली जाऊ शकते. तपास होऊ शकतो. पण त्याआधीच अटक करणं योग्य नाही. त्यांना झालेली अटक कायद्याला आणि नीतीमत्तेला धरुन झालेली नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

परमबीर सिंग पळून गेले नाहीत, त्यांना पळवून लावलंमोठे घोटाळे आणि आरोप असलेले व्यक्ती जेव्हा देश सोडून पळून जातात तेव्हा ते केंद्रीय सत्तेच्या मदतीनंच पळून जातात. परमबीर सिंग हे काही स्वत: पळून गेलेले नाहीत. त्यांना पळवून लावण्यात केंद्रीय सत्तेनं मदत केली आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याचा धंदा यांनी सुरू केला आहे. चिखलफेक करायची, बदनाम करायचं आणि डाव साधायचा असं घाणेरडं राजकारण भाजपाकडून केलं जात आहे, असंही राऊत म्हणाले. 

भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का?अनिल देशमुख यांच्या अटकेसोबतच आज अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. "मला आज कळालं की अजित पवारांच्याही मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. पण मला एक कळत नाही. भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका. काही लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असं म्हणतायत मी एक सांगतो दिवाळीनंतर आम्ही जर बॉम्ब फोडायचं ठरवलं तर यांना घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवावं लागेल. पण तसं आम्ही करणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअनिल देशमुखअजित पवार