Join us
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यांवर काय बोलता, तो विषय संपला; महागाईवर बोला, संजय राऊतांचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 10:40 IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली.

मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. भोंग्यांचा विषय आता संपला आहे. भोंग्यांवर बोलू नका, जरा देशातील महागाईच्या मुद्द्यावर बोला. भाजपाचा एकतरी नेता वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर बोलतोय का?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

"भोंग्यांचा विषय आता संपला आहे. महाराष्ट्रात संपूर्ण शांतता आहे. काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पण राज्यातील जनतेनंच त्यांना करारा जवाब दिला आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नव्हता. फक्त हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी तो काढला गेला. पण हा मुद्दा उठलाच नाही. कोर्टाच्या निर्णयानुसारच राज्यात काम होत आहे. यासंदर्भात जर काही करायचं असेल तर राष्ट्रीय धोरण आणा. कारण इथं काही जात आणि धर्माचा विषय येत नाही. भोंग्यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका आज हिंदूंनाच बसला आहे. भजन-किर्तन करणाऱ्यांना धक्का बसला. या भूमिकेवर सर्वाधिक नाराज कोण असेल तर तो हिंदू समाज आहे. हिंदू समाजात गट निर्माण करण्याचा कट होता. पण तसं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

रशिया-युक्रेन सोडा महागाईवर बोला"देशात महागाई इतकी वाढलीय की त्यावर कुणी केंद्रातला नेता बोलायला मागत नाही. भाजपाचा एकही नेता आज महागाईवर का बोलत नाही. आज देशासमोर महागाई हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. पण इथं देशातील जनता महागाईशी युद्ध करतेय. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर यासंदर्भात भाजपाचा एकतरी नेता बोलतोय का? रशिया आणि युक्रेनचं त्यांचं ते पाहून घेतील. तुम्ही देशातील महागाईवर बोला. भोंग्यांवर कसले बोलता. महागाईवर बोला. भोंग्यांवर बोलणं तुमचं काम नाही", असं संजय राऊत म्हणाले.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराज ठाकरेमनसेउद्धव ठाकरे