Join us

Sanjay Raut: कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट, CM शिंदेंवरही थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 09:56 IST

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मुंबई - कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे. तर, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन या हल्ल्यामागे दिल्लीचा हात असण्याची शंका उपस्थित केली आहे. 

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या हल्ल्यासंदर्भात शंका उपस्थित करताना सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता, संजय राऊत यांनीही या हल्ल्यामागे दिल्ली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. राऊत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

''दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले  त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ!'', असे ट्विट राऊत यांनी केलं आहे. त्यासोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात  तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेना लक्ष्य केलं. 

मनसे आमदार राजू पाटील यांनीही व्यक्त केली शंका

मनसेचे नेते आमदार राजू पाटील यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. एकाचवेळी ३-३ ठिकाणी हल्ला होत असल्याने हा हल्ला उत्स्फुर्त आहे की पुरस्कृत याचा सरकारने शोध घ्यावा, गरज पडल्यास केंद्राने चौकशी करावी, अशी मागणीच मनसेनं केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे, आमदारांच्या भूमिकेला मनसेनंही मान्य केल्याचं दिसून येतं. त्यामुळे, आता राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मंगळवारी नेमकं काय घडलं

महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूसही पेटून उठल्याचे दिसून येते, पुण्यात काही कन्नड बसेसना काळं फासण्यात आलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केलाय. मनसेनंही यावर भूमिका घेत सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केलीय.  

टॅग्स :एकनाथ शिंदेनरेंद्र मोदीकर्नाटकसंजय राऊत