Sanjay Pandey will do Parambir Singh's Chakshi, a big decision of the state government | संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चाैकशी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चाैकशी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्धची प्राथमिक चौकशी नूतन पोलीस महासंचालक संजय पांडे करतील. मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांच्याबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
एनआयएच्या ताब्यातील निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला दर महिना १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा ‘लेटरबॉम्ब’ टाकून राज्य सरकारला अडचणीत आणले. या आरोपाच्या चौकशीचे उच्च न्यायालयाने आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझेचे पाेलीस सेवेत ‘पुनर्वसन’ करण्यापासून त्याची मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागातील (सीआययू) नियुक्ती व सर्व महत्त्वाच्या तपास त्याच्याकडे देण्यामागे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग हेच कारणीभूत होते, असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. विविध आठ मुद्द्यांवरील या अहवालावर प्राथमिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सरकारने ही चौकशी पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेल्या पांडे यांच्याकडे साेपविली आहे. त्यांच्या अहवालानंतर राज्य सरकार त्याबद्दल पुढील कार्यवाही करेल, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Pandey will do Parambir Singh's Chakshi, a big decision of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.