Join us  

सांगलीचा तिढा अखेर सुटणार; गुढी पाडव्याचा मुहूर्त, मविआचे जागावाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 8:20 AM

केवळ सात जागा जाहीर हाेणे बाकी असताना बाहेर येणार फॉर्म्युला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सोमवारी दिल्लीत सुटणार असल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यानंतर मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

मविआची जागा वाटपाची बोलणी सुरू असताना उद्धवसेनेने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. परस्पर उमेदवार जाहीर केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव सेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या जागेबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धवसेनेशी बोलणीही थांबवली. याबद्दल निर्णय घेण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना केली होती. सांगलीतील काँग्रेस आमदार दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींनाही भेटून आले. उद्धवसेनेकडून संजय राऊत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. सोमवारी सांगलीच्या जागेचा तिढा सुटेल, असे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले. गुढीपाडव्याला ४८ जागांच्या वाटपाची अधिकृत घोषणा मंगळवारी करणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद हाेईल.

कॉंग्रेस-उद्धवसेनेकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण

चंद्रहार पाटील हेच उमेदवार :  राऊतnसांगलीतून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. काँग्रेसच्या हायकमांडशी माझे बोलणे झाले आहे. दोन दिवसांत त्यांच्याकडूनही हीच घोषणा होईल. nकाँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना येथे हातात हात घालून काम करतील. मैत्रीपूर्ण लढत ही  एकत्र लढणाऱ्यांसाठी घातक आहे. मार्ग काढणे हाच त्यावरचा उपाय आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राऊतांनी नौटंक्या बंद कराव्यात :  नाना पटोलेnउद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद कराव्यात. काय बोलावे याच्या मर्यादा ठरवाव्या, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले.nमहाविकास आघाडीतील प्रश्न आम्ही सामोपचाराने सोडवू, तसेच सांगलीचा प्रश्न उद्या सोडवू, असे पटोले म्हणाले. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.

बच्चू कडू यांचा रामटेकमध्ये काँग्रेसला पाठिंबाअमरावती येथे नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविला. माघार घेण्यासाठी बच्चू कडू यांची समजूत काढली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना समर्थन जाहीर करीत आता भाजपशी जुळवून घ्यायचे नाही, असा संदेश कडू यांनी दिला आहे.

टॅग्स :सांगलीकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरे