Join us  

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांची पुन्हा विनंती; संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या उमेदवारीमागचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:07 PM

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगली लोकसभेसाठी पुन्हा विनंती केली. यावर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे. सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळाली आहे. या जागेवर काँग्रेसनेही दावा केला होता, यामुळे महाविकास आघाडीत गुंता वाढला होता. दरम्यान, गुढी पाडव्या दिवशी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले. यावेळी सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याचे जाहीर झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी सांगली काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगली लोकसभेसाठी पुन्हा विनंती केली. आता यावर प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही जागा ठाकरे गटाला का पाहिजे यामागचं कारण सांगितलं आहे. 

भुजबळांचा मोठा खुलासा: नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी अजित पवार-पटेलांना थेट दिल्लीतून सूचना

यावेळी माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, विश्वजीत कदम किंवा विशाल पाटील असतील त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुने कार्यकर्ते आहेत. सांगलीत अनेक वर्षापासून पक्षाच काम करतात. तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीत जातीयवादी शक्तिंना ताकद मिळाली आहे. सांगलीत संघाचा उमेदवार विधानसभेला निवडून येतो, मिरजेतही संघाचा उमेदवार निवडून येतो. मिरजेत दंगली घडवल्या जातात. हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना माहिती आहे, गेल्या १० वर्षापासून  सांगली लोकसभेतही भाजपाचे उमेदवार निवडून येतात. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणे गरजेचे आहे ही जनभावना आहे, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. 

"सांगली काँग्रेस काम करते, वसंतदादा पाटील असतील, अन्य प्रमुख नेते वर्षानुवर्षे काम करतात त्यांचा आम्हाला आदर आहे. पण, आज परिस्थिती वेगळी आहे, त्यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जयंत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे, आता काँग्रेसनेही ती जागा शिवसेनेला सोडली. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही नक्की आदर करु आणि भविष्यात काय करता येईल ते पाहू, असं आश्वासनही संजय राऊत यांनी दिले. 

टॅग्स :संजय राऊतलोकसभा निवडणूक २०२४काँग्रेसविश्वजीत कदमचंद्रहार पाटीलविशाल पाटील