"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:11 IST2025-12-25T13:00:00+5:302025-12-25T13:11:11+5:30
घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या भाजपला संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर
Sandeep Deshpande: अनेक वर्षांचा संघर्ष आणि राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे युती जाहीर केली आहे. मुंबईत पार पडलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होताच सत्ताधारी भाजप टीकेची झोड उठवली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा समाचार घेतला. मुंबई महानगरपालिका म्हणजे ठाकरेंचा कोणताही फॅमिली बिझनेस नाही. ही युती केवळ सत्ता टिकवण्यासाठी केलेली लाचारी असल्याची जोरदार टीका करण्यात आली. भाजपच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. भाजपच्या फॅमिली बिझनेस या टीकवर बोलताना दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी भाजप नेत्यांनी स्वतःच्या घरात पाहावे. भाजपच्या अनेक नेत्यांचे नातेवाईक, मुले आणि पत्नी आजही नगरसेवक किंवा राजकारणात सक्रिय असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.
दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट नाही
"एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष सोबत जी युती केली आहे ती कशासाठी आहे. खुर्ची उबवण्यासाठीच केली आहे ना. मुख्यमंत्री पद मिळालं नसतं तर ही युती केली असती का तर नाही. अदानी फॅमिली साठी ही महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. यांनी कसली डेव्हलपमेंट केली. दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यांनी भरलेले आहेत. भारतीय जनता पक्ष २५ वर्षे महापालिकेत सत्तेत होता. भाजपचे लोक स्वतःला पहारेकरी म्हणून घेत होते तेव्हा ते काय झोपा काढत होते का याचे उत्तर त्यांनी पण द्यावं," असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
"आशिष शेलार यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. अमित साटम यांचा मेहुना नगरसेवक आहे. आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांचे भाऊ सुद्धा नगरसेवक आहेत. अजून यादी निघेल मग कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल. अदानींच्या फॅमिली साठी तुम्हाला महानगरपालिका ताब्यात हवी आहे का हे पण एकदा सांगावं," असंही संदीप देशपांडे म्हणाले.
२९ डिसेंबर रोजी या महायुतीची पहिली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची जागावाटपाबाबत अंतिम बैठक पार पडणार आहे. मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेतही या युतीचे पडसाद उमटणार हे निश्चित.