sambhaji brigade warning to Tanhaji: The Unsung Warrior trailer | 'तान्हाजी'च्या ट्रेलरवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; 'सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा...'
'तान्हाजी'च्या ट्रेलरवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; 'सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा...'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांचा आगामी सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर 3 मिनिटे 21 सेकंदांचा असून यामधील संवाद, कलाकारांचा अभिनय, भव्यदिव्य सेट, युद्धाचे प्रसंग लक्ष वेधून घेतात. तसेच, हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. मात्र, या सिनेमाच्या ट्रेलरबाबतसंभाजी ब्रिगेड या संघटनेने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. 

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी साधू लाकूड फेकून मारत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे. असा चुकीचा इतिहास जनतेसमोर जावू नये. ट्रेलरमधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक टीआरपी वाढविण्यासाठी असे कृत्य करण्यात आले आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. 

याचबरोबर, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमातील आक्षेपार्ह गोष्टी वगळण्याची मागणी करत सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडकडून सेन्सॉर बोर्ड, राज्यपाल यांनाही निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.

दरम्यान, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title: sambhaji brigade warning to Tanhaji: The Unsung Warrior trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.