Join us

"दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई"; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:51 IST

दोघांचे फोटो व्हायरल झाले असून भाजपकडून टिका करण्यात येत आहे. तर, सदाभाऊ खोत यांनीही बोचरी टिका केली आहे.  

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी बारामतीमध्ये आले आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हेसुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे अदानींचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार गाडीचं सारथ्य करत होते. दोघांचे फोटो व्हायरल झाले असून भाजपकडून टिका करण्यात येत आहे. तर, सदाभाऊ खोत यांनीही बोचरी टिका केली आहे. 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा गौतम अदानींना उद्योग क्षेत्रात झुकतं माप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून होत असतो, त्या पार्श्वभूमीवर आज अदानी पाहुणे म्हणून बारामतीमध्ये आल्याने अनेकांना आश्चर्चाया धक्का बसला आहे. राजीव गांधी सायन्स आणि टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने आज बारामतीमध्ये बारामती सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आले. विशेष म्हणजे गौतम अदानी हे सपत्नीक या कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे, शरद पवार यांनी त्यांचे आभारही मानले.

रोहित पवार आणि अदानी यांचा गाडीतील फोटो शेअर करत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावर बोचरी टिका केली. ''लुटारू आले की घोड्यावरून यायचे. आता गाड्यांमधून येतात. दोन लुटारू भाई भाई, अवघा देश लुटून खाई..'' असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

दरम्यान, गौतम अदानींच्या स्वागताची जबाबदारी रोहित पवार यांनी पार पाडली. गौतम अदानींचं स्वागत केल्यानंतर रोहित पवार यांनी स्वत: गाडी चालवत अदानी यांना कार्यक्रमस्थळी नेले. रोहित पवार आणि अदानी यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजप समर्थक आणि भाजप नेत्यांकडून या फोटोवरुन राष्ट्रवादीवर टिका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी सातत्याने अदानी आणि अंबानींच्या नावाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टिका केली होती. त्याची आठवणही भाजप समर्थकांनी करुन दिली. 

 

टॅग्स :सदाभाउ खोत भाजपारोहित पवारअदानी