Sachin Vaze Letter : bjp target me and Chief Minister uddhav thackery', anil parab says in pc ov sachin vase letter | Sachin Vaze Letter : माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट, अनिल परबांनी सांगितलं भाजपचं राजकारण

Sachin Vaze Letter : माझ्या आडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट, अनिल परबांनी सांगितलं भाजपचं राजकारण

मुंबई - 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, या आरोपामागे थेट भाजपा असल्याचा आरोप परब यांनी केलाय. (sachin vaze case transport minister anil parab refuses sachin wazes allegations says ready to face any inquiry)

"सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप मी धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. हफ्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत", असं अनिल परब म्हणाले. 

माझा या दोन्ही विषयाशी काहीही संबंध नाही. माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा हा डाव आहे. याप्रकरणातून सरकारची आणि माझी बदनामी भाजपाकडून बदनामी करण्यात येत आहे. मात्र, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे. माझा गृहखात्याशी काय संबंध?. शिवसेना पक्षाचे पोलिसांशी संबंधित प्रश्न मी पाहात होतो. मंत्रीपदावर असतानाही आणि नसतानाही मी हे विषय गेल्या कित्येक वर्षांपासून हाताळतो आहे. शिवसैनिकांची अनेक कामे मी पोलिसांशी बोलून करतो, ते माझे कामच आहे, असेही परब यांनी म्हटलं. दरम्यान, याबाबत, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री यासंदर्भात भाष्य करतील, असेही त्यांनी म्हटलं. 

भाजपनं शिजवलेलं कारस्थान

सचिन वाझे यानं लिहिलेलं पत्र हे भाजपनं शिजवलेलं कारस्थान असल्याचा आरोपही यावेळी अनिल परब यांनी केला आहे. "भाजपवाले गेल्या दोन दिवसांपासून ओरडत होते की आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ. म्हणजे हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. त्यामुळे हे भाजपनं शिजवलेलं कारस्थान आहे. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अशा आरोपांना घाबरत नाही", असं अनिल परब म्हणाले. 

कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार

"सचिन वाझेंनं माझ्यावर केलेले आरोप खोटे असून सीबीआय असो, एएनआय असो किंवा मग रॉ आणा. मी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. इतकंच काय तर माझी नार्को टेस्ट करा त्यासाठीही मी तयार आहे", असं खुलं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sachin Vaze Letter : bjp target me and Chief Minister uddhav thackery', anil parab says in pc ov sachin vase letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.