'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 10:29 IST2024-05-01T10:27:48+5:302024-05-01T10:29:58+5:30
'आरटीई' अंतर्गत पालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे.

'आरटीई' प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत दिली मुदतवाढ; मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये २९ हजार १४ जागा उपलब्ध
मुंबई : शिक्षण हक्क अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महानगरपालिका व खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार १४ जागा उपलब्ध आहेत.
'आरटीई' अंतर्गत पालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. ऑनलाइन प्रवेशाची मुदत ३० एप्रिलपर्यंत होती. 'आरटीई' अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील 'आरटीई'च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत.
• या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. प्रवेशप्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी केले आहे.