Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:55 IST2025-10-15T16:43:06+5:302025-10-15T16:55:43+5:30
Ghatkopar Robbery: मुंबईच्या घाटकोपर परिसरात दरोडेखोरांनी एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकत गोळीबार केला.

Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
Ghatkopar Robbery:घाटकोपरच्या अमृतनगर परिसरात बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दर्शन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दोन अज्ञात व्यक्तींनी कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून ही लूट केली. दरोडेखोरांना पळून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दुकानमालक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुकानमालक नेहमीप्रमाणे दुकान उघडून साफसफाई करत होते, त्याच वेळी दोन हल्लेखोर आत घुसले. त्यापैकी एकाने दुकानमालकाच्या मानेवर कोयता ठेवला, तर दुसऱ्याने बंदूक दाखवून धमकावले. आरोपींनी दुकानातील दागिन्यांच्या ट्रेमध्ये असलेले सोने लुटण्यास सुरुवात केली.
दागिन्यांसह आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना दुकानमालकाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात आरोपींनी त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, आरडाओरड ऐकून स्थानिक लोक जमा होऊ लागल्याने दरोडेखोरांमध्ये गोंधळ उडाला. या गडबडीत आरोपींचे काही ट्रे दुकानात, तर काही बाहेर रस्त्यावर पडले.
तिसऱ्या साथीदाराचा सहभाग
मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांव्यतिरिक्त, त्यांचा एक तिसरा साथीदार दुकानाबाहेर पाळत ठेवून होता. लोकांनी पाठलाग सुरू करताच, मोटारसायकलवरील दोघे पळून गेले, तर तिसरा आरोपी हातात बंदूक घेऊन पळाला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि इंदिरानगरच्या डोंगरावरून पळून गेला.
पोलिसांकडून तपास सुरू
दरोड्यात किती किमतीचे दागिने चोरीला गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दुकानमालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्त राकेश ओला यांनी आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगितले. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने मुंबईतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.