Riteish Deshmukh explained the loan of millions of rupees on farm land, ration | देशमुखांच्या शेतजमिनीवर कोट्यवधींचं कर्ज, रितेशनं दिलंय स्पष्टीकरण
देशमुखांच्या शेतजमिनीवर कोट्यवधींचं कर्ज, रितेशनं दिलंय स्पष्टीकरण

मुंबई - सोशल मीडियावर सध्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते  विलासराव देशमुख यांच्या मुलांच्या शेतजमीनाचा 7/12 उतारा व्हायरल होत आहे. या उताऱ्यावरील कर्जाचा बोजा दाखवून रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांना ट्रोल करण्यात येत आहे. मात्र, या उताऱ्याबाबत स्वत: रितेश देशमुखनेच स्पष्टीकरण दिलंय. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील 11 एकर जमिनीवर चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या 7/12 उताऱ्याचा खुलासा आता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. ‘मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही’, असं रितेशने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनीही देशमुख कुटुंबीयांच्या शेतजमिनीसंदर्भातील ही कागदपत्रे ट्विट करुन रितेश देशमुखला लक्ष्य केलं होतं. रितेशने मधू किश्वर यांना टॅग करुन या कागदपत्रांसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. मी व अमितने कुठलेही कर्ज घेतले नाही, सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात आहेत. त्यामुळे कुठल्याही कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, असे रितेशने म्हटले आहे. तसेच, कृपया अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका, असेही रितेशने म्हटले होते. दरम्यान, रितेशच्या ट्विटनंतर मधू यांनी ते फोटो आणि ट्विट डिलीट केलंय. 
मात्र, रितेशने स्पष्टीकरण दिल्याने सोशल मीडियावरुन विलासराव देशमुखांच्या कुटुबीयांची होणाऱ्या बदनामीला पूर्णविराम मिळाला, असेच म्हणता येईल. 

Web Title: Riteish Deshmukh explained the loan of millions of rupees on farm land, ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.