बदला घेतला की फसविले? घटस्फोटीत पतीच्या नावावर महिलेने केले ५० लाखांचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:00 IST2025-10-15T10:00:23+5:302025-10-15T10:00:47+5:30
लग्नानंतर दोघांनी ४४ लाखांचे गृहकर्ज काढून प्रतीक्षानगरमध्ये घर खरेदी केले होते. दोघेही हप्ते भरत होते.

बदला घेतला की फसविले? घटस्फोटीत पतीच्या नावावर महिलेने केले ५० लाखांचे कर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घटस्फोटानंतर पूर्वाश्रमीच्या पतीच्या नावावर बनावट कागदपत्रे, फेसबुकवरील फोटोंचा वापर, तसेच बोटांच्या बनावट ठशांचा वापर करून ५० लाखांचे गृहकर्ज घेतल्याची घटना समोर आली आहे. बजाज फायनान्स कंपनीकडून हे कर्ज घेण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नानंतर दोघांनी ४४ लाखांचे गृहकर्ज काढून प्रतीक्षानगरमध्ये घर खरेदी केले होते. दोघेही हप्ते भरत होते. मात्र, घटस्फोटाच्या वेळी घर पत्नीच्या नावावर करण्यात येईल. गृहकर्जाचे हप्तेही १ नोव्हेंबर २०२३ पासून पत्नीच फेडेल आणि घराचे तक्रारदाराच्या नावावरील ५० टक्के शेअर्स गिफ्ट डीड करून पत्नीच्या नावावर करून देणार असे कन्सेंट टर्ममध्ये नमूद होते. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने कार खरेदीसाठी एचडीएफसी फायनान्समध्ये कर्जासाठी अर्ज केला असता, त्यांचा सीबिल रिपोर्ट तपासण्यात आला.
खोटी सही, बनावट ठसे
सीबिल तपासणीत त्यांच्या नावावर ५० लाखांचे गृहकर्ज आढळले. चौकशीत, हे कर्ज पत्नीने २ मे २०२४ रोजी प्रतीक्षानगर येथील घरासाठी अंधेरी पूर्व येथील बजाज हाउसिंग फायनान्समधून घेतल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार यांनी ‘बजाज’च्या कार्यालयात कागदपत्रांची पाहणी केली असता, कर्ज अर्जात त्यांना को-ॲप्लिकंट दाखविले होते. अर्जामध्ये त्यांची खोटी सही, बनावट अंगठा ठसा तसेच फेसबुकवरील फोटो एडिट करून वापरण्यात आला होता.