‘बेस्ट’चे निवृत्त कर्मचारी आझाद मैदानात, ४,५०० जणांची थकली ६०० कोटींची ग्रॅच्युइटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:53 IST2025-08-07T12:52:40+5:302025-08-07T12:53:45+5:30

निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळत नसल्याने बेस्ट उपक्रमाला प्रचंड रोष सहन करावा लागत आहे.

Retired BEST employees at Azad Maidan, 4500 people have exhausted gratuity worth Rs 600 crore | ‘बेस्ट’चे निवृत्त कर्मचारी आझाद मैदानात, ४,५०० जणांची थकली ६०० कोटींची ग्रॅच्युइटी 

छाया : सुशील कदम 

मुंबई : ‘बेस्ट’मधील जवळपास साडेचार हजार निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांची सप्टेंबर २०२२ पासून उपदानाची तसेच २०१९ पासून अंतिम देणी बाकी आहे. ही रक्कम जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या घरात असून, ती देण्यासाठी उपक्रमाकडून कोणतीच पावले उचलण्यात येत नसल्याने बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनने बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. या वेळी पालिका प्रशासन आणि बेस्ट यांनी ही देणी भागवण्यासाठी वेगळ्या स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी आंदोलक तसेच युनियनने केली. 

निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळत नसल्याने बेस्ट उपक्रमाला प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. आधीच उपक्रमाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकवली जात असल्याचा आरोपही होत आहे. देणी न मिळाल्यामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी ते आर्थिक संकटात सापडले आहेत. 

निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी तत्काळ द्यावी आणि जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत, त्यांना देय असलेली रक्कम तातडीने मिळावी, याकरिता त्याचे नियोजन बेस्टने करावे, अशी मागणी बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन वर्कर्स युनियनने आंदोलनावेळी केली. 

‘पालिकेकडून दुसरा 
हप्ता लवकरच’
महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘बेस्ट’साठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील पहिला हप्ता एप्रिलमध्ये दिला आहे, तर दुसरा हप्ताही काही दिवसांत देण्यात येईल, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले. 
बेस्टचे नवीन महाव्यवस्थापक, युनियन आणि पालिका यांच्यात लवकरच चर्चा करून देण्यांचा विषय लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन युनियनला दिल्याची माहिती बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या : शेलार
बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या व युनियनशी चर्चा करून तोडगा काढा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना दिले.
आझाद मैदानात आंदोलनावेळी युनियनतर्फे सरचिटणीस शशांक राव यांनी शेलार यांना कामगारांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी तातडीने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. शेलार यांनी कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
    

 

Web Title: Retired BEST employees at Azad Maidan, 4500 people have exhausted gratuity worth Rs 600 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.