मुंबईतील मराठी शाळांची श्वेतपत्रिका काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:30 PM2018-12-11T23:30:27+5:302018-12-11T23:31:01+5:30

मराठी शाळांकडे पालकांचा कमी होत असलेला कल रोखण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र पुन्हा पुढे सरसावले आहे.

To remove whitepaper of Marathi schools in Mumbai | मुंबईतील मराठी शाळांची श्वेतपत्रिका काढणार

मुंबईतील मराठी शाळांची श्वेतपत्रिका काढणार

googlenewsNext

मुंबई : मराठीशाळांकडे पालकांचा कमी होत असलेला कल रोखण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र पुन्हा पुढे सरसावले आहे. त्यानुसार गोरेगाव येथे ८ आणि ९ डिसेंबर रोजी मराठीप्रेमी पालक महासंमेलन आयोजित करून त्यांनी पालक महासंघाचा कृती आराखडा जाहीर केला. या अंतर्गत मराठी अभ्यास केंद्रातर्फे शहरातील मराठी शाळांचा सर्व्हे केला जाईल आणि मुंबईतील मराठी शाळांची सद्य:स्थिती दर्शवणारी श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राच्या शाळा गटाच्या प्रमुख डॉ. वीणा सानेकर यांनी दिली.

मराठी अभ्यास केंद्रामार्फत जाहीर केलेल्या कृती आराखड्यात पालक महासंघाची ११ सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कृती आराखडा दोन स्तरांवर कार्य करणार असून एकीकडे संघ शाळांच्या स्तरावर काम करेल तर दुसरीकडे मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल, असे सानेकर म्हणाल्या. या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाप्रमाणेच मराठी शाळांमधील पालकांना सजग आणि सुजाण करण्यासाठी पालक प्रबोधन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. तसेच मराठीप्रेमी पालक महासंमेलन मुंबईपुरते मर्यादित न ठेवता ते राज्यव्यापी करण्यासाठी संघ प्रयत्नशील राहणार आहे. भाषा विभागांतर्गत मराठी शाळांचा उपविभाग स्थापन करण्यासाठी व त्याच्या सक्षमीकरणासाठी पाठपुरावा करणे तसेच मराठी शाळांच्या वेतनेतर अनुदानात वाढ व्हावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणे हे या अंतर्गत महत्त्वाचे कार्य असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुर्गम भागांतील मराठी शाळांसाठी असलेला बृहत् आराखडा तडकाफडकी रद्द झाल्यामुळे अनेक शाळा भरडल्या गेल्या. न्यायप्रविष्ट असलेल्या या बृहत् आराखड्याच्या मान्यतेसाठी मराठी अभ्यास केंद्र पुन्हा प्रयत्न करणार आहे. सोबतच सर्व मंडळांच्या शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
- दीपक पवार,
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र

Web Title: To remove whitepaper of Marathi schools in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.