Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:36 AM2021-04-27T05:36:43+5:302021-04-27T06:45:59+5:30

देशात रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत.

Remdesivir : Only half the dose ofRemdesivir; Maharashtra received only 1,13,638 injections in five days | Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन

Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई : देशभरातून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी हे इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वाढत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, वस्तुस्थिती समोर न आणता, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यात मग्न आहेत.

देशात रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत. त्यात हैदराबाद येथे हेतेरो, तारापूरला सिप्ला, बंगळुरूला मायलॅन, अहमदाबाद येथे झायड्स कॅडिला, हैदराबाद येथे डॉक्टर रेड्डीज, नोएडा येथे जुबिलंट आणि सिक्कीम येथे सन फार्मा यांचा समावेश आहे. या सात कंपन्यांची एकूण उत्पादन क्षमता रोज १,४४,००० इंजेक्शन बनवण्याची आहे. झायड्स कॅडिलाचे दोन दिवस तर जुबिलंट कंपनीचे चार दिवस शून्य उत्पादन झाले आहे. याचा परिणाम देशभरातल्या रेमडेसिविरच्या पुरवठ्यावर झाला आहे.

जनआरोग्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, राज्यात आरोग्य सचिवांनी एक विशिष्ट स्वरूपाचा अर्ज तयार करून दिला आहे. त्यामध्ये माहिती भरल्याशिवाय हे इंजेक्शन देऊ नये, अशा सूचना आहेत. पण खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचे फारसे पालन होताना दिसत नाही. शिवाय या इंजेक्शनचे उत्पादन सुरू केल्यापासून ते बाजारात येईपर्यंत २१ दिवस लागतात. एक बॅच उत्पादित झाल्यानंतर ती १४ दिवस निर्जंतुकीकरणासाठी ठेवली जाते. त्यानंतर त्याची तपासणी होते. त्यानंतरच ती बॅच बाजारात येते.

आपण काही दिवसांपूर्वी या सर्व कंपन्यांना उत्पादन वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हवा तेवढा साठा बाजारात येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेणे सुरू केले आणि सुरुवातीला फेविपिराविरसारख्या गोळ्या सुरू केल्यास कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. पण सध्या महागडी औषधे देण्याचा आणि ती वापरून पाहण्याचा कल वाढत चालला आहे, त्याला काय करणार? रेमडेसिविर हे जीवरक्षक इंजेक्शन नाही, असे मत टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले.

असे ठरले आहे वाटप

केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती रेमडेसिविर द्यायचे त्याचे वाटप ठरवले. आपल्याकडील शिल्लक स्टॉक आणि रोज मिळणारे इंजेक्शन यांची गोळाबेरीज करून केंद्र सरकारने दहा दिवसांत ३६ राज्यांना १६ लाख इंजेक्शन वाटपाचे नियोजन केले. मात्र, या सात कंपन्यांपैकी मायलॅन कंपनीचे २१ ते २५ एप्रिलपर्यंत शून्य उत्पादन झाले आहे. 

१० टक्के रुग्णांना इंजेक्शनची गरज 

एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंखेच्या १० टक्के रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज पडते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे गृहीत धरले तर देशात आज २८ लाख ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. याचा अर्थ २ लाख ८० हजार रुग्णांना रोज या इंजेक्शनची गरज भासत आहे. महाराष्ट्राला दहा दिवसांत ४ लाख ३५ हजार इंजेक्शन मिळार होते. पण, प्रत्यक्षात गेल्या पाच दिवसांत सात कंपन्यांनी महाराष्ट्राला फक्त १,१३,६३८ रेमडेसिविर इंजेक्शन्स दिले आहेत. त्यामुळे सरकारने गृहीत धरलेल्या १० टक्के रुग्णांनादेखील हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्याशिवाय खासगी हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन सर्रास लिहून दिले जात आहे. त्यामुळेही हे आणखी दुर्मिळ होत आहे.

Web Title: Remdesivir : Only half the dose ofRemdesivir; Maharashtra received only 1,13,638 injections in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.