रेकॉर्ड ब्रेक; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटर कोसळधारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 15:22 IST2020-08-06T15:22:15+5:302020-08-06T15:22:39+5:30
३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

रेकॉर्ड ब्रेक; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटर कोसळधारा
मुंबई : मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची नोंद होत असून, गुरुवारी सकाळी ५.३० वाजता नोंदविण्यात आलेल्या ३३० मिलीमीटर पावसाने ऑगस्ट महिन्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हवामान खात्याकडील माहितीनुसार, १९७४ सालापासूनच्या पावसाच्या नोंदीचा विचार करता १९९८ साली ऑगस्ट महिन्यात मुंबईत २६१ मिलीमीटर एवढया मोठया पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आता २०२० साली ऑगस्ट महिन्यात ३३० मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. एका अर्थाने १९७४ सालापासून म्हणजे गेल्या ४६ वर्षांतला ऑगस्ट महिन्यात नोंदविण्यात आलेला ३३० मिलीमीटर हा आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे. तर गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
सकाळी ५.३० वाजता सांताक्रूझ येथे १४६.१ तर कुलाबा येथे ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत होते. सकाळी ५.३० वाजता हिंदमाता येथे साचलेले पाणी पुर्णत: ओसरले. परिणामी रस्ते वाहतूक सुरळीत झाली. मुंबई सेंट्रल परिसरातील नवजीवन परिसरात साचलेले पाणी ओसरले. येथील रस्ते वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती महापालिकेने सकाळी साडेपाच वाजता प्रसार माध्यमांना दिली. सकाळी ७ वाजेपर्यंत शेख मिस्त्री दर्गा, बीपीटी कॉलनी स्कायवॉक, खेतवाडी, सक्कर पंचायत, महर्षी कर्वे रोड, नायर रुग्णालय परिसर, सी.पी. टँक, मस्जिद बंदर, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, गोवंडी येथील प्रगती निवास येथे पावसामुळे पाणी भरले होते. पाण्याचा उपसा करण्यासाठी ठिकठिकाणी ५१ पंपिंग कार्यरत होते. सर्व सबवेच्या ठिकाणी पपिंग वेगाने कार्यरत होते. शहरात ५ ठिकाणी झाडे कोसळली. हार्बर आणि मध्य रेल्वे सुरु झाली नव्हती. पश्चिम रेल्वे साधारण वेगात धावत होती. रस्ते वाहतूकीमध्ये गांधी मार्केट, शेल कॉलनी, मुंबई सेंट्रल, गोल देऊळ, नायर रोड, संत रोहिदास चौक येथे बेस्टची वाहतूक वळविण्यात आली होती. सकाळी ८ वाजता मध्य आणि हार्बर रेल्वे सुरु झाली. सकाळी ८.३० वाजता कुलाबा येथे ३३१.८ तर सांताक्रूझ येथे १६२.३ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री मुंबईत ठिकठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. गुरुवारी सकाळी देखील पावसाची रिमझिम सुरु होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने ब-यापैकी विश्रांती घेतली.