एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:26 IST2025-03-19T14:25:43+5:302025-03-19T14:26:36+5:30
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सेलने एलएलबी सीईटीसाठी २७ डिसेंबरला नोंदणी सुरू केली होती. त्याची मुदत १७ मार्चला संपली.

एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ
मुंबई : सीईटी सेलकडून ३ वर्ष एलएलबी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी अशा ९१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंतची ३ वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाची ही सर्वाधिक नोंदणी आहे. त्यातून यंदा एलएलबीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस राहणार आहे.
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सेलने एलएलबी सीईटीसाठी २७ डिसेंबरला नोंदणी सुरू केली होती. त्याची मुदत १७ मार्चला संपली. यंदा एलएलबी सीईटीसाठी राज्यभरातून तब्बल १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ९१,०८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे शुल्क भरून नोंदणी अंतिम केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात १०,९६२ ने भर पडली आहे. गेल्यावर्षी ८०,१२५ जणांनी एलएलबी सीईटीसाठी अर्ज भरले होते. यातील ६८,१४४ जणांनी परीक्षा दिली होती. एलएलबी प्रवेशासाठी गेल्यावर्षी २१,०७१ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २०,३७४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा सीईटी देणाऱ्यांची मोठी आहे. प्रवेशाचा कटऑफ अधिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
का वाढले अर्ज?
कायद्याचे ज्ञान व्हावे या उद्देशाने अनेकजण नोकरी अथवा व्यवसाय करताना आणखी एखादी पदवी मिळवावी या उद्देशाने एलएलबीकडे वळत आहेत. त्यातूनही ही संख्या वाढल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
पाच वर्ष विधीसाठी
३४ हजार अर्ज
बारावीनंतर विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘५ वर्ष एलएलबी’साठी ३४,०४९ जणांनी अर्ज भरले. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या घटली आहे. गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाला ३४,७६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.
कधी होणार परीक्षा
सीईटी परीक्षा ३ आणि ४ मे रोजी घेण्यात येणार आहे.