मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:57 PM2019-11-05T17:57:18+5:302019-11-05T17:58:02+5:30

शिवसेनेला प्रस्ताव मिळाला नसल्यास पुन्हा प्रस्ताव देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Ready to discuss CM post, but...; BJP on shivsena | मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू

मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू

Next

मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सत्तेतल्या पदांचं समसमान वाटप व्हावं, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरूच आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी धरलेला आग्रह आणि भाजपाने सत्तास्थानांच्या समसमान वाटपाबाबत घेतलेली आडमुठी भूमिका यामुळे अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच आता भाजपानं एक पाऊल पुढे टाकत शिवसेनेला नवा प्रस्ताव दिला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली, त्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शिवसेनेला नवा प्रस्ताव दिल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

शिवसेनेला प्रस्ताव मिळाला नसल्यास पुन्हा प्रस्ताव देण्यासाठी आम्ही तयार आहोत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं. दिवाळी असल्यानं यापूर्वी बैठक झालेली नव्हती. पण आज जाहीर स्वरूपात बैठक झाली. आम्ही शिवसेनेची वाट पाहतो आहोत, सरकार आमचंच बनणार आहे. त्यांना प्रस्ताव गेला नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा प्रस्ताव पाठवण्यास तयार आहोत. आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषयच उपस्थित होत नाही. फक्त त्यांनी सुरुवात करण्याची गरज आहे, असंही मुनगंटीवारांनी स्पष्ट केलेलं आहे,

तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनीही महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला. या दोन्ही नेत्यांची विधानं विसंगत असल्यानं मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजपानं 1995 मध्ये जो फॉर्म्युला वापरला होता, त्याच फॉर्म्युल्यानुसार खातेवाटपाची मागणी शिवसेनेनं केली आहे. 1995मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, तर भाजपाकडे उपमुख्यमंत्रिपद होतं.  
 

Web Title: Ready to discuss CM post, but...; BJP on shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.