भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:42 IST2025-06-28T06:41:29+5:302025-06-28T06:42:22+5:30
प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
मुंबई : प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आणि सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड १ जुलै रोजी मुंबईत केली जाईल. त्यासाठी केंद्रीय भाजपने केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केली.
प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल. चव्हाण हे सध्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतील. चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी नांदेड येथे २६ मे रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना ‘भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण’ असा उल्लेख केला होता.
डोंबिवलीचे आमदार असलेले ५५ वर्षीय चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तेव्हापासूनच ते नवे भाजप प्रदेशाध्यक्ष असतील असे मानले जात होते. फडणवीस यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. पूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.
पक्षाच्या पद्धतीनुसार प्रदेशाध्यक्ष या पदासाठी अर्ज मागविले जातील. चव्हाण यांचा एकट्याचा अर्ज येईल चव्हाण यांचा एकट्याचा अर्ज येईल आणि नंतर त्यांच्या नावाची घोषणा मुंबईत १ जुलै रोजी होईल. त्यानंतर एक महिन्यात पक्षाचे अधिवेशन होईल आणि चव्हाण यांच्या नावावर मान्यतेची मोहोर उमटेल.
हे अधिवेशन ठाणे येथे होण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांची प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठे अपयश आले. मात्र विधानसभेला दणदणीत विजय मिळाला होता.
राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच
भाजपच्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्याची पद्धत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आणखी काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील.
नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक ४, ५ आणि ६ जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. त्यादरम्यान भाजप आणि संघ नेतृत्वात चर्चा होऊन राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव ठरेल.