सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून होतोय फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 23:30 IST2020-04-19T23:26:22+5:302020-04-19T23:30:36+5:30
भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून होतोय फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर - नारायण राणे
मुंबई - 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये,' अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रचण्यात येत असलेल्या कटकारस्थानांना इशारा दिला होता. दरम्यान, भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर होत आहे, असा टोला नारायण राणे लगावला आहे.
नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहीत नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!'
दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात एकजुटीने सामना करु, पक्षीय राजकारण बाजूला ठेवा असं वारंवार आवाहन करत असतानाही भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्रमक शैलीत उत्तर दिलं होतं. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझनेवालो को इशारा काफी है अशा शब्दात ट्विटरवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच असंविधानिक वागणुकीला इतिहास कधीच माफ करणार नाही असंही म्हटलं होतं.