Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:06 IST

Ramdas Athawale: रामदास आठवलेंनी भाजप आणि शिंदे सेना यांच्यावर निशाणा साधला असून महायुतीने विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. जागावाटपात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाई) स्थान न मिळाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. "हा केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे," अशा शब्दांत आठवलेंनी भाजप आणि शिंदे सेना यांच्यावर निशाणा साधला असून महायुतीने विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी भाजप १३७ आणि शिंदे गट ९० जागांवर लढणार असल्याचे सूत्र सोमवारी रात्री निश्चित झाले. मात्र, या जाहीर झालेल्या आकडेवारीमध्ये रिपाईच्या वाट्याला एकही जागा नसल्याचे स्पष्ट झाले. रामदास आठवले यांनी १६ जागांची आग्रही मागणी केली होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ताटकळत ठेवण्यात आल्याने रिपाई कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे.

रामदास आठवलेंचा अल्टिमेटम

रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. "महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल  दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल," असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

प्रवीण दरेकर यांची मध्यस्थी आणि महायुतीचा दावा

दुसरीकडे, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या संविधान निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. दरेकर म्हणाले की, "आठवले साहेबांच्या नाराजीतही प्रेम असते. जागावाटपावर अद्याप अंतिम मोहोर उमटलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या विषयावर लक्ष ठेवून असून, रिपाईला सन्मानजनक जागा दिल्या जातील."

रिपाईची ताकद आणि महायुतीचे भवितव्य

रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितले आहे की, "आमचा पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, सत्ता त्यांनाच मिळते, हा इतिहास आहे." रिपाईने २६ वॉर्डांची यादी महायुतीला दिली असून त्यापैकी किमान १६ जागा मिळाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, भाजप आणि शिवसेना आपल्या कोट्यातून रिपाईला जागा सोडणार का? की रामदास आठवले महायुतीला सोडून वेगळी चूल मांडणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayal! RPI aggressive as allies delay; Athawale issues ultimatum.

Web Summary : RPI upset over seat allocation in BMC elections. Ramdas Athawale alleges betrayal by BJP, Shiv Sena. He demands 16 seats, threatening to leave the alliance if demands are unmet. BJP attempts damage control.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६महायुतीभाजपाएकनाथ शिंदेमुंबई महापालिका निवडणूक २०२६