Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 09:21 IST

शिवसेनेने सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करत भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करत भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातच रिपाइं नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकाराण्याचा सल्ला दिला आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, निवडणुकीत जनतेनं महायुतीला कौल दिला असून सत्तास्थापनेसाठी काय निर्णय घेता येईल हे येत्या तीन- चार दिवसांत स्पष्ट होईल. तसेच शिवसेनेचा समान जागा वाटपाचा फॅार्म्यूला भाजपाला मान्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेने पाच वर्षासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारुन आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवण्याचा सल्ला शिवसेनेला दिला आहे. त्याचप्रमाणे भाजपाने शिवसेनेला अशी ऑफर दिल्यास शिवसेना स्वीकारेल असं देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. 

दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. भाजपा आताही मोठा भाऊ म्हणून समोर आल्यानंतर शिवसेनेला महत्त्वाकांक्षा असलेलं मुख्यमंत्रिपद मिळणं काहीसं अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेनंही आता भाजपावर दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हरयाणा आणि महाराष्ट्रातील निकालांची तुलना करत भाजपाला टोला लगावला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेरामदास आठवलेशिवसेनाभाजपा