राज्यसभेचा बिगुल : महाराष्ट्रातील ७ जागांवर कोणाची लागणार वर्णी? एकूण ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:09 IST2026-02-19T05:06:37+5:302026-02-19T05:09:15+5:30
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी महविकास आघाडीची एकजूट महत्त्वाची असेल.

राज्यसभेचा बिगुल : महाराष्ट्रातील ७ जागांवर कोणाची लागणार वर्णी? एकूण ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह एकूण ३७ जागांसाठी बुधवारी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी महविकास आघाडीची एकजूट महत्त्वाची असेल.
कुणाचे किती संख्याबळ?
भाजप १३१
शिंदेसेना ५७
राष्ट्रवादी (अजित पवार) ४०
उद्धवसेना २०
काँग्रेस १६
राष्ट्रवादी (शरद पवार) १०
अपक्ष आणि इतर १२
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत.
मतांचे गणित कसे असेल?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पवार यांना काँग्रेस आणि उद्धवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो. मात्र, वाढलेले वय आणि प्रकृती लक्षात घेता पवार राज्यसभेवर जातील का? हा प्रश्न आहे. पवारांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर आघाडीला सहमतीचा उमेदवार द्यावा लागेल.
राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. तसेच केंद्रात मंत्री असल्याने भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
महाराष्ट्रातून एनडीएचे निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना : २६ फेब्रुवारी
उमेदवारी अर्ज अंतिम मुदत : ५ मार्च
उमेदवारी अर्जांची छाननी : ६ मार्च
अर्ज माघारीची मुदत : ९ मार्च
मतदान : १६ मार्च (स. ९ ते संध्या. ४)
मतमोजणी : १६ मार्च (संध्या.५ पासून)तीन खासदार वाढणार
महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या सात जागांपैकी सध्या भाजपकडे दोन आणि मित्रपक्ष रिपाइंची एक अशा एनडीएच्या तीन जागा आहेत. तर महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या दोन तसेच काँग्रेस आणि उद्धवसेनेची प्रत्येकी एक अशा चार जागा रिक्त होत आहे. मात्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता एनडीएच्या सहा जागा निवडून येतील. त्यामुळे राज्यसभेत महाराष्ट्रातून एनडीएचे संख्याबळ तीनने वाढेल.
शिंदेसेनेत माजी खासदार राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा. अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.