“ठाकरे गट सोडण्यास खूप उशीर झाला, एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होतोय”; राजूल पटेलांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:18 IST2025-01-28T20:16:36+5:302025-01-28T20:18:19+5:30
Rajul Patel Slams Thackeray Group: तुमच्या डोक्यावर बसून पुन्हा निवडून येऊन दाखवणार, असा एल्गार करत शाखेसंदर्भात पुरावा देण्याचे आव्हान राजूल पटेल यांनी दिले.

“ठाकरे गट सोडण्यास खूप उशीर झाला, एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होतोय”; राजूल पटेलांचा घणाघात
Rajul Patel Slams Thackeray Group: मला असे वाटत आहे की मी खूप उशीर केला. यापूर्वीच एकनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांनी अनेकदा सांगितले की, तुम्ही आले पाहिजे. पण मी एकनिष्ठ म्हणून काम करत राहिले. विभागात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. त्यावरून मला वाटले की, आता आपल्याला काही किंमत राहिलेली नाही. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या राजूल पटेल यांनी दिली.
मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. खासदार संजय राऊत यांनी दौरा केलेल्या पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे. शिवसेना शिंदे गटात का प्रवेश केला, याची कारणे सांगताना राजूल पटेल यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
आता एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होत आहे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा आता उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या कामाच्या पद्धतीवरच आम्ही प्रेरित होऊन त्यांच्यासोबत आलो आहोत, असे सांगत राजू पेडणेकर आणि माझा वाद तत्त्वांचा होता. पक्षासाठी होता. संघटनेसाठी भांडणे होती. परंतु, आमच्यातील वाद किंवा भांडणे सोडवण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. पदाधिकाऱ्यांनी कधीही याबाबत विचारणा केली नाही. कधीही समोर बसून समजावले नाही. पदाधिकाऱ्यांनी फक्त आगीत तेल ओतायचे काम केले. आमची समजूत कोणी काढली नाही. हारून खान यांना तिकीट देऊन त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्यानंतर आता आमचे डोळे उघडले आणि आता एकनिष्ठ राहिल्याचा पश्चाताप होत आहे, या शब्दांत राजूल पटेल यांनी संताप व्यक्त केला. तसेच स्वार्थासाठी गेले, असे म्हणणाऱ्यांनी कार्यकर्त्यांसाठी काही केले आहे का, अशी विचारणा करत माझी मनधरणी करण्याचे खूप प्रयत्न झाले. परंतु, त्यांना यश आले नाही. त्यात ते हरले म्हणून आता राहिलेल्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगावे लागेल यासाठी माझ्यावर टीका केली जात आहे. स्वार्थासाठी जायचे असते तर निवडणुकीपूर्वीच गेले असते. भाजपाकडून आमदारकीची ऑफर होती. परंतु, तेव्हा निर्णय घेतला नाही, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करते. वेळ आली की, सिद्ध करून दाखवेन. रणरागिणीची पळरागिणी झाली, अशी माझी खिल्ली उडवली जात आहे. मी कुठेही पळून जाणार नाही. मी इथेच आहे. तुमच्या डोक्यावर बसून पुन्हा निवडून येऊन दाखवणार, असा एल्गार राजूल पटेल यांनी केला. शाखेचे म्हणाल तर १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका झाल्यावर ४ लाख रुपये देऊन ती जागा विकत घेतली होती. १९९९ पासून त्या जागेचे लाइटबिल माझ्या नावावर आहे. कुणी म्हणत असेल की शाखेसाठी मार खाल्ला आहे, तर तसा पुरावा आणून द्यावा, असे आव्हान राजूल पटेल यांनी अनिल परबांना दिले. तसेच मी शाखा बनवली आहे, लोकांसारखी कार्यालये थाटलेली नाहीत. शाखेची मालकी माझी आहे, असे पटेल यांनी ठामपणे सांगितले.