छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 05:55 IST2025-07-07T05:47:41+5:302025-07-07T05:55:18+5:30

राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे.

Rajan Kabra of Chhatrapati Sambhajinagar is the topper in CA; CA final results announced, Mumbai's Manav Shah is third in the country | छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा

छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा

मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, छत्रपती संभाजीनगर येथील राजन काबरा याने देशात प्रथम, तर मुंबईतील मानव शाह याने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. राजन याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवले; तर कोलकाता येथील निष्ठा बोथ्रा ही देशात दुसरी आली. तिला ५०३ गुण मिळाले. मानव शाहला ४९३ गुण मिळाले.

राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे.

देशभरातून ९९,४६६ विद्यार्थ्यांनी यंदा सीएची परीक्षा दिली. यात सीए ग्रुप एकच्या परीक्षेला ६६,९४३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १४,९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २२.३८ टक्के निकाल लागला, तर ग्रुप दोनची परीक्षा ४६,१७३ विद्यार्थ्यांनी दिली, पैकी १२,२०४ म्हणजे  २६.४३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या निकालानंतर देशपातळीवर १४,२४७ जण चार्टर्ड अकाैंटंट म्हणून पात्र ठरले आहेत.

दररोज एवढे तास अभ्यास करायचा, असा नियम केला नव्हता; पण अभ्यासात सातत्य ठेवले होते. आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा यांचा फोन आला आणि त्यांनी मला देशात पहिला आल्याची बातमी दिली व अभिनंदन केले. तेव्हा, विश्वासच बसला नाही. नंतर देशभरातून फोन येऊ लागले आणि मला व माझ्या कुटुंबाला एवढा आनंद झाला की, आभाळ ठेंगणे झाले. नोकरी करायची की व्यवसाय करायचा, याचा अजून निर्णय घेतलेला नाही. वडील सीए मनोज काबरा हे माझ्यासमोरील आदर्श राहिले आहेत.

राजन काबरा, सीए फायनल

परीक्षेत देशात अव्वल 

‘सीए इंटरमीजिएट’मध्ये मुंबईची दिशा पहिली

सीए इंटरमीजिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू देशात पहिली, तर छत्रपती संभाजीनगरचा यश देविदान दुसरा आला. दिशाला ५१३, तर यशला ५०३ गुण मिळाले. जयपूरची यमिश जैन आणि उदयपूरचा निलय डांगी यांनी एकत्रित तिसरा क्रमांक पटकाविला. त्या दोघांना ५०२ गुण मिळाले.

सीए फाउंडेशन परीक्षेत मुंबईचा यज्ञेश दुसरा : सीए फाउंडेशन परीक्षेत वृंदा अग्रवाल ३६२ गुण मिळवून देशात अव्वल ठरली; तर मुंबईचा यज्ञेश नारकर ३५९ गुण मिळवून दुसरा आला. ठाण्याच्या शार्दूल विचारे याने ३५८ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.

दररोज १० ते १२ तास अभ्यास करत होतो. या यशामुळे आई-वडिलांना भरपूर आनंद झाला आहे. मोठा भाऊ सीए आहे. अभ्यासात त्याची मदत झाली.

मानव शाह, सीए फायनल परीक्षेत देशात तिसरा

Web Title: Rajan Kabra of Chhatrapati Sambhajinagar is the topper in CA; CA final results announced, Mumbai's Manav Shah is third in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.