Join us

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा, मोदींविरोधात करणार प्रचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:30 IST

सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला.

ठळक मुद्देनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबतही मनसेने सस्पेन्स कायम ठेवला आहे. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. याबाबत सुत्रांनी माहिती दिल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. येत्या 19 मार्चला हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात मनसे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला.

मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपावर तुफानी टीकास्त्र सोडले होते. तसेच, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत आचारसंहिता लागल्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट करु असे सांगितले होते. त्यामुळे येत्या 19 मार्चला राज ठाकरे मनसेची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्ष नेत्यांच्या बैठकीदेखील सुरु आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भ, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असे दौरे देखील केलेले आहे. मोदी लाटेतही ज्या ठिकाणी मनसेला मतदान झाले या मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.   

टॅग्स :राज ठाकरेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमनसे