राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:45 IST2025-11-19T12:43:57+5:302025-11-19T12:45:44+5:30
Varsha Gaikwad News: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मतभेदांचे फटाके फुटू लागले असून, काँग्रेसने राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी मराठीचा राग आळवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र आले आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचं गणित बिघडलं आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मतभेदांचे फटाके फुटू लागले असून, काँग्रेसने राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरेंना सोबत घेण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने आमच्याशी बोलायला हवं होतं, अशी टीका काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज आमची शरद पवार यांच्यासोबत खूप चांगली चर्चा झाली. आमची आघाडी नैसर्गिक आणि सातत्य असलेली आघाडी आहे. आम्ही लोकशाही आणि संविधान मानतो. मुंबईमध्ये मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे. तसेच मुंबईच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली पाहिजे, अशी भूमिका आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडली.
यावेळी मनसेमुळे महाविकास आघाडी तुटली का? असं विचारण्यात आलं असता वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, असं आहे की, मागच्या काही काळात दोन महिन्यांपूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितलं होतं. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्याने आम्ही एकट्याने लढू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बाकी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही शुभेच्छाच देतो. पण हा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा व्हायला हवी होती. काँग्रेस पक्ष हा आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवून आघाडी करतो. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, आमच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.