Join us  

उद्धव ठाकरे शपथविधीः शेवटी रक्ताचच नातं होsss... राज ठाकरेंच्या 'मातोश्रीं'ना अश्रू अनावर, 'CM उद्धव'ही भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:05 PM

उद्धव ठाकरे शपथविधीः ठाकरे कुटुंबीयांसाठी अतिशय भावूक असा आजचा क्षण होता.

मुंबई -  'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  

ठाकरे कुटुंबीयांसाठी अतिशय भावूक असा आजचा क्षण होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपल्या कुटुंबासमवेत या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठाकरे नावाचं गारूड गेली 30 ते 40 वर्ष दिसून येतंय. पण, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री घडविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचं कुणीही सरकारमध्ये सामिल झालं नाही. आज, उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये सहभागी होताना, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि माँसाहेब यांना स्मरण केलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी, कुंदा यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाल्याचं पाहायलं मिळालं. अत्यंत भावनिक असा हा क्षण माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून ठाकरे कुटुंबातील हा जिव्हाळा अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावणारा ठरला. राज यांच्या आई या माँसाहेब मिनाताई यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे काकू आणि मावशी असं दुहेरी नातं उद्धव ठाकरेंचं मातोश्री कुंदा यांच्यासोबत आहे. राज आणि उद्धव यांच्यातील राजकीय वादाची कुठलिही किनार या सोहळ्याला दिसली नाही. राज यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेऊन, हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.  

दरम्यान, मी कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन...' असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईराज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार