राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:33 IST2025-09-06T15:30:42+5:302025-09-06T15:33:54+5:30
नक्कीच यावेळचा दसरा मेळावा न भूतो, न भविष्य असा असेल हा विश्वास माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केला.

राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो. या मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिक येतात मात्र यंदाचा मेळावा वेगळा असणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाल्याचे चित्र राज्याने पाहिले आहे. मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी चर्चा आहे. त्यातच यंदाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना खास मान मिळणार असल्याचे संकेत उद्धवसेनेच्या नेत्याकडून देण्यात आले.
माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले की, निव्वळ दोन पक्षासाठी नव्हे तर राज्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावेत ही लोकांच्या मनातील भावना आहे. गणपती झाल्यानंतर आता दसरा येईल त्यात निश्चितपणे एखादी चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा केली तरी हरकत नाही. दसरा मेळाव्यात पक्षाचे नेतृत्व संकेत न देता वस्तूस्थिती काय, कशाप्रकारे आगामी काळात निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्याचे मार्गदर्शन होईल. दसरा मेळावा हा पक्षाचा नाही, राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून राज्यात जे घडतंय, त्यावर वाटचाल केली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चित उत्सुकता आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच दसरा मेळाव्यात दोन भाऊ एकत्रित दिसतील की नाही हा वेगळा भाग आहे. २ राजकीय पक्ष आहेत. आमचा जसा दसरा मेळावा असतो, तसा त्यांचाही गुढीपाडवा मेळावा असतो. त्यामुळे आम्ही त्यांना आमंत्रित करू, ते आम्हाला आमंत्रित करतील अशीही शक्यता असते. राजकीय व्यासपीठावर आम्ही एकत्र येतो, तेव्हा पक्षाचा आणि युतीचा व्यासपीठ वेगळे असतात. परंतु नक्कीच यावेळचा दसरा मेळावा न भूतो, न भविष्य असा असेल हा विश्वास माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केला. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक मराठी माणसांच्या अस्तित्वाची असणार आहे. आपले अस्तित्व राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ वर्षातलं मुंबईचं स्वरूप बदलत चाललेले आहे, त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस, मुंबईकर माणूस टिकवण्यासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यायला हवे. फक्त एकत्र न येता या शहराचे नेतृत्व केले पाहिजे अशी भावना जशी मुंबईमध्ये आहे तशी नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड येथे आहे. ही काळाजी गरज आहे असंही सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.