जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
By मोरेश्वर येरम | Updated: July 5, 2025 17:17 IST2025-07-05T17:06:55+5:302025-07-05T17:17:01+5:30
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते.

जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
मोरेश्वर येरम
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. अनेकांनी प्रयत्न केले, एकदा नव्हे अनेकदा केले. पण तुटलेली नाळ काही जुळत नव्हती. राजकीय पटलावरील परस्पर विरोधी भूमिकांमुळे पुलावरुन बरंच पाणीही वाहून गेलं होतं. दोन्ही पक्ष हे पक्ष प्रमुखाचा आदेश 'सर आंखों पर' मानणारे असल्यानं कार्यकर्तेही आजवर एकमेकांपासून दूर राहिले. पण कार्यकर्त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात ठाकरे बंधूंसाठी एक भावनिक जागा होती. ती जागा आज एकमेकांची गळाभेट आणि अश्रूंनी पूर्णपणे व्यापून टाकली. 'आवाज मराठीचा' अशी साद घालणाऱ्या व्यासपीठावर मोठ्या भावानं धाकट्या भावाच्या खांद्यावर ठेवलेला हात पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा हा ऐतिहासिक क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी वरळीत तुडुंब गर्दी जमली आणि या गर्दीच्या आनंदाश्रूंपुढे जणू वरळीचा समुद्रही आटला.
वरळीचा डोम ओसंडून वाहला...
ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या मराठीच्या विजय मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते वरळीच्या डोममध्ये हजारोंच्या संख्येनं पोहोचले. वरळी डोमची आसनक्षमताही कमी पडली. अनेकांनी जिथं मिळेल तिथं ठाण मांडलं होतं. खूर्च्यांसोबतच जमिनीवरची मोकळी जागाही शिल्लक राहिली नव्हती. संपूर्ण खचाखच भरलेला डोम आणि बाहेरही तुडुंब गर्दी. इतकी की कार्यकर्त्यांसोबत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही बाहेरच राहावं लागलं. संपूर्ण सोहळा बाहेरुनच अनुभवावा लागला. गर्दीमुळे बाहेर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. जो तो आपल्याला कसं आत जाता येईल यासाठी धडपडत होता. कुणीच ऐकायला तयार नव्हतं. डोमच्या व्हिआयपी गेटवरही इतकी गर्दी झाली की जमावानं गेट तोडून आत प्रवेश केला. अखेर दोन्ही बंधू मंचावर आल्यानंतर बाहेरचा गोंधळ शांत झाला आणि प्रत्येक जण स्क्रिनवर 'तो' ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी स्तब्ध झाला. दोघांचीही भाषणं होईपर्यंत कुणीच जागचं हललं नाही.
भावनांची 'पावरबँक', कार्यकर्ते 'फुल्ल चार्ज'
मराठीचा जागर म्हणून या कार्यक्रमाला प्रस्तुत केलं जात असलं तरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या भावनांनी कार्यकर्त्यांची 'पावरबँक' फुल्ल चार्ज झाली होती. दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते कोळी बँडच्या ठेक्यावर नृत्य करत होते. महिला कार्यकर्त्या एकत्र फुगड्या घालत होत्या. तर कुणी दोन्ही भावांचे मुखवटे घालून एकमेकांना मिठी मारुन आनंद साजरा करत होते.
कोळी ब्रास बँडनं भरला जल्लोष...
मुंबईचे मूळ भूमिपूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांचं पारंपरिक वाद्य असलेल्या ब्रास बँडची व्यवस्था कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. मुंबईतील मूळ भूमिपुत्रांचा सन्मान हे सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कोळी बँडच्या तालावर उपस्थितांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.
'जय जवान'ची सलामी
मेळाव्यात मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. उंचच उंच थर रचण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'जय जवान' गोविंदा पथकानंही या सोहळ्याला उपस्थिती लावली आणि ६ थरांची सलामी देत मराठीचा जयजयकार केला.
थेट अमेरिकेहून मुंबई गाठली...
ठाकरे बंधू एकत्र येणार हे पाहण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक, कलाकार या सोहळ्याला उपस्थित होतेच. पण रवींद्र मराठे नावाचे गृहस्थ या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी थेट अमेरिकेहून मुंबईत आले होते. "अमेरिकेत आज राहणाऱ्या मराठी माणसांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आज आपण इथं आलो आहे असं समजा. कारण आज अमेरिकेतील मराठी माणसाच्याही मनातील इच्छा पूर्ण झाली आहे", असं रवींद्र मराठे म्हणाले.
महाराष्ट्रद्रोहीला चाबकाचे फटके
पालघरहून आलेल्या तुलसी जोशी या मनसेच्या कार्यकर्त्यानं महाराष्ट्रद्रोहीला चाबकाचे फटके देण्याची वेळ आली आहे असा संदेश देणारं एक अनोखं निदर्शनं यावेळी केलं. ज्यात या कार्यकर्त्यानं हातात चाबूक घेऊन महाराष्ट्रद्रोही लिहिलेल्या राक्षसावर आसूड ओढण्याचं प्रातिनिधीक दृश्य सादर केलं. सोबत दोन कार्यकर्ते राज आणि उद्धव ठाकरेंचा मुखवटा परिधान करुन हातात हात घेऊन एकजूटीचं दर्शन घडवत होते.
ठाकरे 'ब्रँड'ची 'ग्रँड' एन्ट्री
खचाखच भरलेल्या डोममध्ये महाराष्ट्र गीतानंतर अखेर तो क्षण आला. संपूर्ण डोममध्ये अंधार झाला आणि एकच आवाज घुमला. सगळ्यांनी आपल्या मोबाइलचे फ्लॅशलाइट उंचावले आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूनं येणाऱ्या 'स्पॉटलाइट'नं या सोहळ्याचे प्रमुख केंद्रबिंदु असणारे ठाकरे बंधू प्रकाशझोतात आले. टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांनी संपूर्ण कार्यक्रम स्थळ दुमदुमलं. त्यावेळीचं आवाजाचं डेसिबल मोजलं गेलं असेल तर नक्कीच आजवरचे रेकॉर्ड मोडीस निघाले असतील अशी स्थिती होती.
दोन्ही बंधूंच्या पाठीराख्या एक समोर, एक मागे!
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे पहिल्या रांगेत बसून कार्यक्रमाचे क्षण डोळ्यांत साठवत होत्या. तर राज ठाकरेंच्या पत्नी मात्र व्यासपीठाच्या मागे प्रचंड भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. कदाचित हा क्षण पाहताना अश्रूंना आवरणं कठीण होईल याची पूर्वकल्पना असल्यानं त्या संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत व्यासपाठीच्या मागेच होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर डोळ्यातील अश्रू पुसत त्या आनंदानं सगळ्यांना आवर्जून भेटल्या. रश्मी ठाकरेंचीही विचारपूस करताना दिसल्या. आपल्या लेकांना (आदित्य-अमित) एकत्र पाहून मन:स्वी आनंद झाल्याचं दोघींच्याही डोळ्यांत दिसलं.
कणखर सेनांचे सैनिक भावुक होतात तेव्हा...
उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंची मनसे. दोन्ही ठाकरेंच्या सेना तशा कणखर बाण्यासाठी, आक्रमक पवित्र्यासाठी ओळखल्या जातात. पण आजच्या मेळाव्यात दोन ठाकरेंना एकत्र पाहून दोन्ही सेनांचे नेते, पदाधिकारी भावुक झालेले पाहायला मिळाले. पडद्यामागून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन पाहणारे अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी कार्यक्रम पार पडल्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. डोळ्यांत आनंदाश्रूंसह परब यांनी हा क्षण माझ्यासाठी एक सण असल्याचं म्हटलं. तर बाळा नांदगावकरांना सारं स्वप्नवत वाटत असल्याचा अनुभव आला. या क्षणाचं शब्दांत वर्णन करणं त्यांना कठीण झालं होतं. नेत्यासह जमलेल्या सर्व कार्यकर्ते आणि मराठी जनांनी या दुर्लभ क्षणांचा ठेवा सोबत नेत कार्यक्रमाचा निरोप घेतला.