महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आज मुंबईतील वरळी येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून विजय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाचे वाभाडे काढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला खडेबोल सुनावले. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
आज झालेल्या विजय सभेमध्ये उपस्थित मराठीप्रेमींना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून घणाघाती भाषण केलं. तसेच सतत हिंदुत्वाचा जप करणाऱ्या भाजपाचा हिंदुत्वावरून समाचार घेतला, ते म्हणाले की, मी मागे बोललो होतो की भाजपा ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी अफवा यांनी पसरवली होती. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा अस्सल, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले.
ते पुढे म्हणाले की, १९९२-९३ साली जेव्हा देशद्रोही माजले होते. तेव्हा मुंबईतल्या अमराठींनासुद्धा आमच्या शिवसैनिकांनी. शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी हिंदू म्हणून वाचवले होते. मराठी माणसांनी वाचवलं होतं, अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली.
यावेळी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ते म्हणाले की, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.