Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त सत्ता नाही..."; संजय राऊतांची मुंबईच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:58 IST

Sanjay Raut on Mumbai BMC Election Result 2026: मुंबईतील निकालाचे आकडे खोटे असा राऊतांनी आरोप केला.

Sanjay Raut on Mumbai BMC Election Result 2026: महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निकालात भाजप-शिंदेसेना महायुतीला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दोन दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या वर्चस्वाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. विकासाच्या मुद्द्याने 'मराठी कार्ड'वर मात केल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन्ही भाऊ एकत्र मैदानात उतरले होते. मुंबईत 'मराठी माणूस' आणि 'मुंबईची अस्मिता' हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून ठाकरे बंधूंनी भावनिक साद घातली होती. मात्र, मुंबईकरांनी या भावनिक आवाहनापेक्षा महायुतीच्या 'विकास' अजेंड्याला अधिक पसंती दिली. पण संजय राऊत यांनी मात्र वेगळेच मत व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live.

"मुंबईवर महापौर बसवण्यासाठी भाजपने शिवसेना फोडली. महाराष्ट्रातील मराठी माणसाला एकजूट ठेवण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. मुंबईतील मराठी माणूस हा राज आणि उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल. ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त सत्ता नाही. आम्ही सत्तेशिवाय राहिलो आहोत. २३ वर्ष आमचा महापौर होता, २४व्या वर्षीही महापौर देण्याचे आमचे शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील," असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मुंबई महापालिकेचे पूर्ण निकाल अजून आलेले नाहीत, तरीही भाजपा मुंबई जल्लोष करताना दिसत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत आकडे वेगळे होते, पण त्यानंतर जे निकाल आले त्यातील बहुतांश निकाल हे शिवसेनेच्या विजयाचे आहेत. न्यूज चॅनलवर दाखवण्यात आलेले आकडे हे खोटे आहेत, भ्रम निर्माण करणारे आहेत. अटीतटीची लढत आहे हे मला मान्य आहे, पण जो फरक दाखवला जात आहे तितका फरक नाही. गेल्या तासाभरात मनसेचे उमेदवार विजयी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत."

"भाजपा सध्या आव्हानाची भाषा करत आहे, भाजप बाहेर जिंकली असेल यात वाद नाही; पण मुंबईत अजूनही लढाई सुरू आहे. सत्तेच्या आणि पैशाचा जोरावर तुम्ही काही ठिकाणी जागा जिंकला असाल, पण अजून लढाई संपलेली नाही. पूर्ण निकाल हाती येण्यासाठी बरीच रात्र होईल. त्यानंतर आपण यावर बोलूया. या क्षणी असे दिसत आहे की लढाई बरोबरच सुरू आहे," असे राऊत यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brand is not just power: Sanjay Raut on Mumbai results.

Web Summary : Sanjay Raut claims BJP split Shiv Sena for Mumbai's mayorship. He asserts Thackeray's influence persists beyond electoral wins. Raut disputes the accuracy of news channel figures, highlighting a close contest. He acknowledges BJP's gains but insists the battle for Mumbai continues, fueled by power and money.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६संजय राऊतउद्धव ठाकरेराज ठाकरे