उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:29 IST2025-08-06T17:27:40+5:302025-08-06T17:29:38+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance in BEST Elections: बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार.

उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance in BEST Elections: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधुंची युती होणार की नाही, हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, सारेच या विषयावर सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. असे असताना, मुंबई पालिका निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोघांची वेगळ्या निवडणुकीसाठी युती झाली आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवारी, १८ ऑगस्टला जाहीर झाली आहे. या सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता असते, त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार आहेत.
यापुढे बेस्टमध्ये कायम एकत्र...
मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिकेत सत्तास्थापना करू शकतात, असा दोन्ही पक्षांच्या समर्थकांना विश्वास आहे. बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी मानली जात आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधूच्या युतीला फार महत्व प्राप्त झाले आहे. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात या युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्ट मधील प्रत्येक लढाई बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.
मराठी माणसाचा रोजगार म्हणजे बेस्ट उपक्रम पण विद्यमान सरकारमधील पुढारी आणि त्यांची धोरणे काही उद्योगपतींना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे दिसते. त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगार हद्दपार होत चालला आहे. त्यामुळे बेस्टमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणे ही मराठी माणसाची एकजूट मोठया ताकदीने उभी राहणे आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटीसाठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होते. पण जून २०२२ नंतर महायुती सरकार भाजप सत्तेत आल्यानंतर बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व-मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे. नवीन नोकर भरती नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अशी भूमिका दोन्ही पक्षांकडून मांडण्यात आली.
बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे. याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यात शंका नाही, असा विश्वास बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.